बातम्याहॅलो कोल्हापूर

‘माधुरी’ परत येणार? कोल्हापूरकरांचा हिसका बघून वनताराचा CEO म्हणाला कोल्हापूरकरांना सहकार्य करणार | Mahadevi Elephant News

कोल्हापूर | कोल्हापूरकरांच्या श्रद्धा आणि भावना जपणारी नांदणी येथील महादेवी उर्फ माधुरी ही हत्तीण (Mahadevi Elephant News) पुन्हा संस्थानकडे परत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिल्यास महादेवीला परत करण्यास वन विभाग तयार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी “जनभावनेचा रेटा लक्षात घेऊन आम्ही सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करू,” अशी अधिकृत भूमिका स्पष्ट केली.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीस वनतारा हत्ती निवारा केंद्राचे सीईओ विहान कराणी, नांदणी मठाचे मठाधिपती, पेटा संस्थेचे प्रतिनिधी, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महादेवीला गुजरातमधील वनतारा केंद्रात हलवण्याच्या निर्णयावर निर्माण झालेल्या जनआक्रोशाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.

मूलतः महादेवी गेल्या 33 वर्षांपासून नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थानात होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिला गुजरातला हलवण्यात आलं. यानंतर नांदणीकर आणि जिल्ह्यातील नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला. याच भावनेच्या आधारावर ‘जिओ’विरोधात ‘बॉयकॉट जिओ’ मोहीम सुरू झाली, जी आता अधिक तीव्र बनली आहे.

बैठकीदरम्यान नांदणी मठाच्या मठाधिपतींनी स्वतः वनताराच्या सीईओंकडे महादेवी हत्तीची परतफेड करण्याची मागणी केली. सीईओ विहान कराणी यांनी न्यायालयाचा आदेश आल्यानंतर हत्तीण परत देण्यास हरकत नसल्याचं सांगितलं, मात्र कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल, असंही स्पष्ट केलं.

या संपूर्ण घटनाक्रमामुळे जिल्ह्यातील वातावरण चिघळलं होतं. त्यामुळे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने आणि इतर नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने हस्तक्षेप केला. यामुळेच वनताराचे अधिकारी, पेटाचे प्रतिनिधी आज कोल्हापुरात दाखल झाले.

यासोबतच पालकमंत्री आबिटकर यांनी नांदणी येथेच हत्ती संगोपन उपकेंद्र सुरू करण्यासंदर्भातही सकारात्मक भूमिका मांडली. गरज भासल्यास अशा केंद्रासाठी वन विभाग तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. परिणामी, नांदणीच्या महादेवी हत्तीला पुन्हा आपल्याच संस्थानात पाहण्याची आशा आता अधिक बळावली आहे.

आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय येतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. जनतेच्या भावनांना न्याय मिळावा, हीच कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker