ठाकरे बंधु पुन्हा एकत्र येणार? महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण आकार घेण्याच्या मार्गावर | Maharashtra Politics
Uddhav and Raj Thackeray alliance, a new twist in Maharashtra politics?
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही वर्षांपासून “ठाकरे विरुद्ध ठाकरे” अशी रंगलेली लढत आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वारस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. या संभाव्य युतीमुळे आगामी महापालिका निवडणुकांचे राजकीय समीकरणच बदलण्याची चिन्हे आहेत.
गेल्या काही दिवसांत राजकीय भेटीगाठींना गती मिळाली आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी नुकतीच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चौथ्यांदा भेट दिली. सामंत यांनी ही शिष्टाचार भेट असल्याचे सांगितले असले, तरी बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे वेगळेच राजकीय अर्थ निघत आहेत. यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही मनसेसोबत युतीची शक्यता सूचित केली आहे. पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “राज ठाकरे यांनी सामंजस्याचा प्रस्ताव दिला आणि आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला. आजही आमचे दरवाजे उघडे आहेत. आता निर्णय राज ठाकरे यांना घ्यायचा आहे.”
१९ एप्रिल रोजी दोन्ही नेत्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांनी या चर्चांना आणखी बळ मिळाले. महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये राज ठाकरे यांनी “महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ गैरसमज विसरण्याची तयारी” दर्शवली, तर त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात “मराठी भाषेसाठी आणि जनतेच्या हितासाठी जुने मतभेद बाजूला ठेवायला तयार आहे” असे सांगितले. मात्र, उद्धव यांनी एक अट ठेवली – राज ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटापासून दूर राहावे.
दरम्यान, २६ एप्रिल रोजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर वेळ आलीयं, एकत्र येण्याची
मुंबई आणि महाराष्ट्रासाठी. शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी! अशी पोस्ट झळकली आणि चर्चेला नवे वळण मिळाले. त्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा दरवाजे खुले असल्याचे जाहीर करत चेंडू राज ठाकरे यांच्या कोर्टात असल्याचे स्पष्ट केले.
मनसेची परिस्थिती आणि राजकीय गरज
राज ठाकरे यांनी २००६ मध्ये शिवसेनेपासून विभक्त होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. सुरुवातीला उत्साही प्रतिसाद मिळाल्याने मनसेने काही ठिकाणी चांगली पकड मिळवली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत पक्षाचा प्रभाव झपाट्याने घटला आहे. नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने १३५ जागांवर उमेदवार उभे केले, पण एकही जागा जिंकता आली नाही. फक्त १.५५ टक्के मतांवर त्यांना समाधान मानावे लागले.
अशा परिस्थितीत, राज ठाकरे यांच्यासमोरील एकत्र येण्याचा प्रस्ताव केवळ भावनिक नाही, तर राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा ठरू शकतो. शिवसेना (उद्धव गट) आणि मनसे यांची युती मराठी मतांवर प्रभाव टाकू शकते. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसारख्या शहरी भागात ही युती भाजप-शिंदे गटासाठी मोठे आव्हान ठरू शकते.
राजकारणातील नवा अध्याय?
राजकीय वर्तुळात यापूर्वीही दोघांमध्ये सामंजस्य साधण्याचे प्रयत्न झाले होते, पण ते यशस्वी झाले नाहीत. मात्र, यावेळी दोन्ही नेत्यांच्या भूमिकेत खरोखरचं लवचीकता दिसून येत असल्याचे दिसत आहे. जुने मतभेद बाजूला सारून, एकत्र येण्याची स्पष्ट तयारी असल्याचे दोघांनीही वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसे युती झाली, तर ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्याची जनतेची इच्छा पूर्ण होऊ शकते. ही युती केवळ दोन पक्षांपुरती मर्यादित न राहता, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरू शकते.


