कोल्हापूर-नागपूर विमानसेवा सुरू; आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी धावपट्टी 3000 मीटरपर्यंत वाढवणार | Kolhapur Airport News
Kolhapur Airport Runway Expansion to 3,000 meters; training school and cargo services planned
कोल्हापूर | कोल्हापूर विमानतळाच्या (Kolhapur Airport) विकासाला आता गती मिळणार असून, येथील धावपट्टी 3,000 मीटरपर्यंत वाढवली जाणार आहे. तसेच 374 कोटी रुपयांचा विस्तारीकरणासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी दिली. कोल्हापूर विमानतळावरील नवीन एटीसी टॉवर, अग्निशमन केंद्र, व्हीआयपी कक्षाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कोल्हापूर-नागपूर या नव्या हवाई सेवेचाही त्यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
धावपट्टी वाढवणार 3,000 मीटरपर्यंत – Kolhapur Airport Expansion
सध्या कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी 1,900 मीटर असून ती 2,300 मीटरपर्यंत वाढवण्याचे काम सुरू आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांची तयारी म्हणून धावपट्टी 3,000 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले. यासाठी आवश्यक असलेला डीपीआर सध्या प्राधिकरणाच्या स्तरावर तयार केला जात आहे. धावपट्टी विस्ताराच्या कामात भूसंपादनास कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर विमानतळाला ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील
कोल्हापूर येथे विमानतळ उभारण्याची संकल्पना ज्यांनी मांडली, त्या ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांच्या नावाने या विमानतळाचे नामकरण व्हावे, ही कोल्हापूरकरांची दीर्घकालीन मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्राप्त झाला असून, मंत्रिमंडळात त्याला मंजुरी मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
विमान प्रशिक्षण शाळा, देखभाल केंद्र उभारणार
कोल्हापुरात लवकरच फ्लाईट ट्रेनिंग स्कूल सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात मुंबईतील एव्हिएशन कंपनीकडून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. विमानतळावर देखभाल-दुरुस्ती केंद्र (मेंटेनन्स सेंटर) आणि मालवाहतूक (कार्गो) सेवेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. भविष्यात एरोब्रिज आणि हँगरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
कोल्हापूर विमानतळाची स्थापना १९३९ साली झाली असून, त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. नागरी विमान वाहतुकीतील एक महत्त्वाचा भाग म्हणून या विमानतळाचा समावेश करण्यात आला होता. गेल्या दहा वर्षांत देशभरात नागरी विमानसेवांचे महत्त्व वाढले असून, अनेक नवीन विमानसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या भारत जगात नागरी विमान वाहतुकीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 4,000 चौरस मीटरमध्ये वसलेल्या कोल्हापूर विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी झाले. या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 256 कोटी रुपये मंजूर झाले असून, त्यात धावपट्टी आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
‘उडान’ योजना आणखी दहा वर्षे
सर्वसामान्य नागरिकांना विमान प्रवास सुलभ व्हावा, याकरिता केंद्र सरकारची ‘उडान’ योजना आणखी दहा वर्षे सुरू ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत सुमारे 4 कोटी 50 लाख नागरिक विमान प्रवास करतील, असा अंदाज असून, यासाठी देशभरात 120 नवीन हवाई मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. येत्या पाच वर्षांत देशातील विमान कंपन्यांनी एकूण 1,300 नव्या विमानांची मागणी (ऑर्डर) दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या कार्यक्रमाला कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, राहुल आवाडे, अशोकराव माने, एअर नेव्हिगेशन सर्व्हिसचे प्रमुख एम. सुरेश, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विमानतळ संचालक अनिल शिंदे, महेश जाधव, विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


