बातम्याहॅलो कोल्हापूर

‘गोकुळ’मधील अरुण डोंगळेंच बंड होणार थंड! Gokul Dudh Sangh

Unity Among Directors Challenges Arun Dongle’s Chairmanship

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’च्या (Gokul Dudh Sangh) अध्यक्षपदावरून जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे (Arun Dongle) यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळमध्ये घमासान सुरु झालं आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर डोंगळे खुर्ची सोडायला तयार नाहीत, त्यामुळे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का बसला आहे. तर डोंगळेंनी घेतलेल्या भुमिके विरोधात संघाच्या २१ पैकी १९ संचालकांनी डोंगळेच्या मोट बांधल्याने डोंगळे बॅकफूटवर गेले आहेत.

गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात सर्व संचालकांनी एकत्र येऊन अरुण डोंगळे यांना चॅलेंज दिले असून, शिरगाव येथील मासिक बैठकीतही त्यांच्याबरोबर कोणताही संचालक दिसून आलेला नाही. त्यामुळे डोंगळेचा एकटेपणा अधिक वाढत चालल्याचे दिसत आहे. अनेक नेते आता या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असून, येत्या दोन दिवसांत डोंगळे राजीनामा देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनीही डोंगळे यांच्यावर थेट टीका केली आहे. “अरुण डोंगळे यांना सत्तेची हाव सुटत नाही. ते शब्द पाळत नाहीत, हा त्यांचा इतिहास आहे. तरीही मी त्यांना आवाहन करतो की ठरल्याप्रमाणे राजीनामा द्यावा,” असे ते म्हणाले.

तसंच, “गोकुळची निवडणूक आम्ही महायुती म्हणून नव्हे तर, शाहू आघाडी म्हणून लढलो आहे. महायुतीचा अध्यक्ष व्हावा अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची इच्छा असती तर, ते मला बोलले असते. मी सुद्धा महायुतीतलाच घटक आहे. सध्या तरी अरुण डोंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. मग अध्यक्षपदाबाबत ते अजित दादांकडं का गेले नाहीत?,” असं हसन मुश्रीफ म्हणाले.

डोंगळे यांनी केलेल्या बंडामुळे ‘गोकुळ’च्या आगामी राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असून, पुढील काही दिवसांत मोठे निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker