मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची तारीख ठरली, कोण होणार नवा अध्यक्ष? National President of NCP
NCP to announce new national president on February 26

मुंबई | 28 जानेवारी रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेने राज्याच्या राजकारणाला मोठा धक्का बसला. मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या विमानाचा बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना भीषण अपघात झाला. या अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते Ajit Pawar यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर राज्यभर शोककळा पसरली असून, राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्या.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत (National President of NCP) प्रश्न उपस्थित होत होते. “नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?” हा प्रश्न राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता. अखेर याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी 26 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सखोल चर्चा केल्यानंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी Sunetra Pawar यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष Praful Patel यांनी बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावानंतर उपस्थित सर्व आमदारांनी हात उंचावून त्यांच्या निवडीला समर्थन दिल्याची माहिती आहे.
दरम्यान, 26 फेब्रुवारी रोजी होणारी कार्यकारिणीची बैठक ही केवळ औपचारिकता असल्याचं मानलं जात आहे. त्या दिवशी अधिकृतरित्या सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्ष संघटनात्मकदृष्ट्या स्थैर्य राखण्यासाठी आणि आगामी राजकीय आव्हानांना सामोरं जाण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. उपमुख्यमंत्रिपदासह त्यांच्याकडे इतर महत्त्वाची खाती सोपवण्यात आली. शपथविधीच्या त्याच दिवशी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पक्षाचा गटनेता म्हणूनही त्यांची निवड करण्यात आली, तसेच पक्षासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे देण्यात आले.
या पार्श्वभूमीवर आता त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. 26 फेब्रुवारीला होणाऱ्या घोषणेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून, या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.

