Prashant Koratkar याचे चीटफंड घोटाळेबाज महेश मोतेवारशी कनेक्शन! ‘रोल्स रॉयस’ कारमुळं बिंग फुटलं?
नागपूर | छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरणाऱ्या आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा ‘समृद्ध जीवन’ घोटाळ्याच्या महेश मोतेवारशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, एका आलिशान रोल्स रॉयस कारमुळे हा प्रकार उघड झाला आहे.
प्रशांत कोरटकरने सोशल मीडियावर स्वतःच्या रोल्स रॉयस कारमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. मात्र, ही कार प्रत्यक्षात चीट फंड घोटाळ्यात गुंतलेल्या महेश मोतेवारच्या मालकीची असल्याचं उघड झालं. आरटीओ नोंदीनुसार, ही रोल्स रॉयस ‘समृद्ध जीवन फुड्स इंडिया लिमिटेड’ या मोतेवारच्या कंपनीच्या नावावर आहे. या कारचा नंबर ‘WB 02 AB 0123’ असा आहे आणि या घोस्ट मॉडेलची किंमत अंदाजे ७ ते ८ कोटी रुपये आहे.
महेश मोतेवारवर देशभरातील ४७०० कोटींच्या चीट फंड घोटाळ्याचा आरोप आहे. साडेचार लाख गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी डिसेंबर २०१५ मध्ये महाराष्ट्र पोलिसांनी मोतेवारला अटक केली होती. त्यानंतर देशभरातील २२ राज्यांमध्ये त्याच्यावर २८ गुन्हे नोंद झाले. त्याच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला, मात्र त्याच्याकडे असलेली रोल्स रॉयस कार मात्र प्रशांत कोरटकर वापरत असल्याचं आता समोर आलं आहे.
महेश मोतेवारवर नंतर सीबीआयनं देखील कारवाई केली होती. तो गेल्या आठ वर्षांपासून ओडिशातील कटक कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र, काही दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात साम टीव्हीने वृत्त दिलं आहे.
प्रशांत कोरटकर नागपूरातून फरार, मध्य प्रदेशात लपल्याचा संशय
मोतेवारची रॉल्स रॉईस कार कोरटकरडे कशी आली, त्यानं ही कार लिलावातून विकत घेतली का, हा लिलाव नेमका कधी झाला, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरं कोरटकर देऊ शकतो. पण तो सध्या फरार आहे. नागपुरातील घरातून पळून गेलेला कोरटकर सध्या मध्य प्रदेशात लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपूर पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.


