धक्कादायक: पुण्यात दररोज 14 महिला बेपत्ता; महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर | Pune Crime News
पुणे | पुणे शहरात बलात्काराच्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, आता महिला व तरुणी बेपत्ता होण्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. 1 जानेवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत पुणे जिल्ह्यात (पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भाग) तब्बल 767 महिला आणि तरुणी बेपत्ता झाल्या आहेत.
पुणे जिल्ह्याचा मोठा विस्तार असून, पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर हे दोन महत्त्वाचे महानगर यामध्ये समाविष्ट आहेत. नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांसह परप्रांतीयांची मोठी वर्दळ या शहरांमध्ये असते.
पोलिस नोंदीनुसार बेपत्ता महिलांची संख्या:
- पुणे शहर: 243 महिला आणि तरुणी बेपत्ता
- पिंपरी-चिंचवड: 271 महिला आणि तरुणी बेपत्ता
- पुणे ग्रामीण: 253 महिला आणि तरुणी बेपत्ता
दररोज सरासरी 14 महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही महिला परत आल्या असल्या तरी अद्याप अनेकांचा शोध लागलेला नाही.
वयोगटानुसार बेपत्ता महिलांचा तपशील:
- पुणे शहर:
- 18 ते 25 वयोगट: 148 तरुणी बेपत्ता
- 26 ते 40 वयोगट: 64 महिला बेपत्ता
- 41 ते 80 वयोगट: 30 महिला बेपत्ता
- पिंपरी-चिंचवड:
- 18 ते 25 वयोगट: 175 तरुणी बेपत्ता
- 26 ते 40 वयोगट: 80 महिला बेपत्ता
- 41 ते 78 वयोगट: 16 महिला बेपत्ता
- पुणे ग्रामीण: 253 महिला बेपत्ता
ही परिस्थिती चिंताजनक असून, पोलिसांनी बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे जाणकार सांगतात. नागरिकांनीही महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


