स्वारगेट बलात्कार प्रकरणाला नवे वळण? आरोपी दत्ता गाडेचा धक्कादायक दावा | Swargate Rape Case
पुणे | स्वारगेट बसस्थानकावर तरुणीवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अटक झाल्यानंतर आरोपी दत्ता गाडे याने पोलिसांसमोर धक्कादायक दावा करत, “मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे सहमतीने संबंध झाले,” असे म्हटले आहे. त्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाल्याचं समोर येतंय. दत्ता गाडेच्या या दाव्यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.
साम टीव्हीच्या वृत्तानुसार, पोलीस कोठडीत दत्ता गाडेने टाहो फोडत, “माझं चुकलं, मी पापी आहे,” असे म्हणत रडून कबुलीजबाब दिला. मात्र, त्याचवेळी त्याने तरूणीसोबत सहमतीने संबंध झाल्याचा दावाही केला. यामुळे या प्रकरणात नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी दत्ता गाडेला मध्यरात्री अटक केली. त्याला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. चौकशीदरम्यान आरोपीने दिलेल्या या विधानामुळे प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला असून, मोठी खळबळ उडाली आहे.
दत्ता गाडेने सगळंच सांगितलं…
आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यालाा गाडीमध्ये बसवलं आणि पुण्याला आणण्यात आलं. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गाडीतच आरोपी दत्ता गाडेची चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे हा रोज रात्री एसटी स्टँडवर जाऊन सावज शोधायचा अशी माहिती समोर आली.
दिवसभर गावामध्ये थांबून तो रात्री पुण्यात शिवाजीनगर, शिरूर, स्वारगेट एसटी स्टँडवर महिला सावज हेरायचा अशी कबुली गाडे याने दिली आहे. यापूर्वी ही स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीच्या संशयातून त्याला स्वारगेट स्टँडवरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होतं.
दत्ता गाडेने याआधी देखील काही महिलांसोबत अशाच पद्धतीने अत्याचार केला केला असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. काही महिलांसोबत गोड बोलून मोबाईल नंबर घेऊन जवळीक निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
दत्ता गाडेचा तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न फसला
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी दत्ता गाडे याच्या गळ्यावर व्रण दिसून येत आहेत. यामुळे त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं दर्शवत आहेत. बलात्कार केल्यावर दत्ता गाडे हा फरार होता. पोलीस आपल्या शोधात आहेत तसेच आपला फोटो सुद्धा माध्यमांमध्ये दाखवण्यात येत असल्याचं आरोपीच्या लभात आलं. यानंतर आरोपी दत्ता गाडे याने आपल्या शेतात गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही दोरी तुटली. यानंतर आरोपी दत्ता गाडे याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा निश्चय केला. मात्र, त्याला कीटकनाशक मिळाले नाही. यानंतर पुन्हा आरोपीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.


