दोघांच्या सहमतीने सगळं झालं! स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीच्या वकिलांचा कोर्टात मोठा दावा, कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा..
पुणे | स्वारगेट बसस्थानकावर 25 फेब्रुवारी रोजी 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर 72 तासांच्या शोधानंतर पोलिसांनी अटक केली. आरोपीला शुक्रवारी संध्याकाळी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे पोलिसांनी त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. मात्र, आरोपीच्या वकिलांनी यास विरोध केला.
आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद
आरोपीचे वकील वजीदखान बीडकर आणि साजिद खान यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, संबंधित मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली होती आणि तिच्या मर्जीनेच संबंध प्रस्थापित झाले. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त दोन दिवसांची कोठडी द्यावी. तसेच, आरोपीचे फोटो माध्यमांमध्ये समोर आल्याने त्याला बुरखा घालून कोर्टात का आणले गेले, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. आरोपीवर आधी काही गुन्हे दाखल असले तरी ते सिद्ध झाले नाहीत, त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही, असेही वकिलांनी स्पष्ट केले.
सरकारी वकिलांचा प्रतिवाद
सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, आरोपीने तक्रारदार महिलेला ‘ताई’ म्हणत विश्वास संपादन केला आणि तिच्या गावाला जाणारी बस कुठे लागते, हे दाखवतो असे सांगून तिला बसमध्ये नेले. आरोपीवर आधीच सहा गुन्हे दाखल असून, त्यातील पाच प्रकरणांमध्ये महिलांनी तक्रार दिली आहे. त्यामुळे आरोपीचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन संशयास्पद असल्याचे सरकार पक्षाने मांडले.
14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपीने आणखी अशा गुन्ह्यांची तक्रार आहे का, याचा शोध घ्यायचा आहे. तसेच, गुन्हा घडल्यानंतर तो कोणाच्या संपर्कात होता, हे तपासण्याची गरज आहे. गुन्हा करताना आरोपीकडे मोबाईल होता, त्याचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.
कोर्टाचा निर्णय
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी दत्तात्रय गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


