बातम्या

पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी दत्ता गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं? Pune Rape Case

पुणे | स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला आज शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती टी. एस. गायगोले यांच्या समोर सुनावणी पार पडली असून त्याला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय? 

आरोपीवर दाखल असलेल्या 6 गुन्ह्यापैकी 5 गुन्ह्यात तक्रारदार महिला आहेत. त्यामुळे त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते स्पष्ट होते आहे. या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपचा आहे. आरोपी सराईत असल्याने त्याने यापूर्वी आणखी काही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत गैरकृत्य केलेले आहे का हे तपसायचे आहे.

त्याचबरोबर आरोपीला मदत करणारे आणखी काहीजण त्याच्यासोबत आहेत का हे तपासायचे आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी 14 दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक आहे. सरकारी वकिलांनी याआधीच्या गुन्ह्यांची आणि आरोपीवर दाखल असलेल्या आताच्या गुन्ह्यांची माहिती दिली. 

शिवाजीनगर कोर्टाबाहेर महिलांचे जोरदार आंदोलन

सुनावणीपूर्वी न्यायालयाबाहेर महिलांनी जोरदार आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलक महिलांना ताब्यात घेतले असून, शिवाजीनगर न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

आरोपीच्या वतीने ऍड. वाजिद खान यांची बाजू मांडणार असून, न्यायालयात वकील आणि मीडियाची मोठी गर्दी उसळली. कोर्टाने गर्दी कमी करण्याचे निर्देश दिले असून, जोपर्यंत लोक बाहेर जात नाहीत तोपर्यंत सुनावणी होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

पत्रकारांना कोर्टात प्रवेश देण्यात आला असला तरी, वकिलांना बाहेर काढण्यात आले आहे. यामुळे वकील संतप्त झाले असून, न्यायालयात गोंधळाचे वातावरण आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा