राधानगरीत गव्याचा हल्ला; गगनबाड्यात देखील दोन दिवसांपूर्वी गव्यांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी | Radhanagari Gaur Attack

राधानगरी : राधानगरी तालुक्यातील पडसाळी येथील चव्हाणवाडी परिसरात शुक्रवारी (दि. २९) सकाळी गव्याच्या हल्ल्यात (Radhanagari Gaur Attack) एका शेतकऱ्याला दुखापत झाल्याची घटना घडली. विलास सीताराम नाके (वय ५०) असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
चव्हाणवाडी हा परिसर धामणी प्रकल्पाच्या टोकाला तसेच दाजीपूर अभयारण्याच्या सीमेलगत वसलेला आहे. या भागातील बहुतांश नागरिकांचा मुख्य आधार दुग्धव्यवसाय असून अनेक कुटुंबे शेती व पशुपालनावर अवलंबून आहेत. रोजगाराच्या शोधात अनेक तरुण मुंबईसह इतर शहरांकडे स्थलांतरित झाले असून गावात राहणारे नागरिक शेती आणि दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास नाके हे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या म्हशी चारण्यासाठी गावाच्या पश्चिमेकडील ‘उंबराचा माळ’ परिसरात गेले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास झुडपांमधून अचानक बाहेर आलेल्या गव्याने त्यांच्या पाठीमागून जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला आणि पाठीला दुखापत झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. आनंदा नागले यांच्या चारचाकी वाहनातून जखमी विलास नाके यांना कसबा तारळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी शेतकऱ्याची विचारपूस केली. तसेच घटनेची नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, गव्याच्या हल्ल्याची ही जिल्ह्यातील अलकडच्या दिवसातील दुसरी गंभीर घटना मानली जात आहे. दोन दिवसांपूर्वी गगनबावडा तालुक्यातील साखरी येथे करवंद काढण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या दाम्पत्यावरही गवा रेड्याने अचानक हल्ला केला होता. या घटनेत सोनाबाई दत्तात्रय कांबळे या गंभीर जखमी झाल्या होत्या, तर त्यांचे पती दत्तात्रय शंकर कांबळे यांना किरकोळ दुखापत झाली होती.
प्राथमिक माहितीनुसार, सोनाबाई कांबळे आणि दत्तात्रय कांबळे हे काही महिलांसह करवंद काढण्यासाठी जंगलात गेले होते. परतीच्या मार्गावर इतर सोबती पुढे निघून गेल्यानंतर पाठीमागे राहिलेल्या या दाम्पत्यावर गवा रेड्याने पाठीमागून जोरदार धडक दिली. या हल्ल्यात सोनाबाई कांबळे यांच्या हाताला गंभीर मार लागून कोपरापासून हात मोडला होता. तसेच त्यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली होती.
या सलग घडणाऱ्या घटनांमुळे दाजीपूर अभयारण्य आणि जंगलालगतच्या गावांमधील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी, करवंद किंवा इतर वनउत्पादने गोळा करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्त्यांशी वाढत असलेला संपर्क यामुळे अशा घटनांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

