बातम्याहॅलो कोल्हापूर

Satej Patil Vs Dhananjay Mahadik: तर त्यांचा 2 लाख 70 हजार मतांनी कार्यक्रम झाला नसता; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार..

कोल्हापूर | खासदार धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी जोरदार पलटवार (Satej Patil Vs Dhananjay Mahadik) केला आहे. राज्यसभेचे खासदार म्हणून बोलताना थोडं तारतम्य बाळगायला हवं, असा टोला लगावत सतेज पाटील म्हणाले की, “जर खासदार धनंजय महाडिक यांच्या बोलण्यावर कोल्हापूरकर मतदान करत असतील, तर त्यांचा दोन लाख 70 हजार मतांनी कार्यक्रम झाला नसता.” धनंजय महाडिक यांनी काँग्रेसला केवळ तीन ते चार जागा मिळतील, असा दावा केला होता. त्या दाव्यावर प्रत्युत्तर देताना सतेज पाटील यांनी कोल्हापूरमधील निवडणूक ही कोल्हापूरकर विरुद्ध महायुती अशीच असल्याचं स्पष्ट केलं.

सतेज पाटील म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून महायुतीची सत्ता असून या काळातील कारभाराचा पंचनामा जनता करत आहे. कोल्हापूर शहराची सध्याची अवस्था पाहता नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांची अवस्था खराब आहे, वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे, तसेच मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर कोणताही ठोस उपाय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची निवडणूक ही जनतेचा रोष आणि महायुतीच्या अपयशी कारभाराविरोधातील लढाई असल्याचं त्यांनी सांगितलं.

या वेळी गेल्या तीन वर्षांतील विविध वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्यांची पुस्तिका देखील प्रकाशित करण्यात आली. या पुस्तिकेच्या माध्यमातून शहराच्या दुरवस्थेवर प्रश्न उपस्थित करत महायुतीवर हल्लाबोल करण्यात आला. सतेज पाटील म्हणाले की, “मी कोणतीही भविष्यवाणी करणार नाही, मात्र कोल्हापूरकर आम्हाला स्पष्ट बहुमत देतील, याचा मला पूर्ण विश्वास आहे.”

आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना आम्ही केलेल्या कामांची यादी लोकांसमोर मांडणार असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलं. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून महायुतीची सत्ता असल्याने या कालावधीत झालेल्या कारभाराची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे, असं ते म्हणाले. महापालिकेत आमची सत्ता असताना हसन मुश्रीफ यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेत होती. त्या काळात राष्ट्रवादीचा महापौर दोन वर्ष होता आणि परिवहन सभापतीपद देखील त्यांच्याकडेच होतं. त्यामुळे त्या काळावर टीका करता येत नसल्याने आमदार राजेश क्षीरसागर माझ्यावर टीका करत असल्याचा टोला सतेज पाटील यांनी लगावला.

धनंजय महाडिक यांना भूतकाळात घेऊन जायचं असल्याचं सांगत त्यांनी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून महापालिकेची सत्ता आपल्या हातात असल्याची आठवण करून दिली. आम्ही टॅगलाईनच्या माध्यमातून सकारात्मक पद्धतीने प्रचार करत आहोत. त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसल्याने ते आमच्यावर टीका करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, महायुतीचे उमेदवार बिनविरोध कसे निवडून येत आहेत, यावरही सतेज पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. प्रशासकांवर सरकारचा पूर्ण कंट्रोल असल्याचं पालकमंत्री स्वतः मान्य करतात. मग गेल्या तीन वर्षांत कोल्हापूरमध्ये झालेल्या बोगस कामांची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे, असं ते म्हणाले. निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर झाल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी निवडणूक आयोगाने करावी, अशी मागणीही यावेळी केली.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker