Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
बातम्याहॅलो कोल्हापूर

राहुल आवाडे ‘अभी तो बच्चा है’; महायुतीविरोधात सतेज पाटलांची जोरदार टीका | Satej Patil Vs Rahul Awade

कोल्हापूर | महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापले असून काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी आज महायुतीवर कडाडून टीका केली. महायुतीतील नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी काय बोलायचे याचे तारतम्य ठेवावे, असे सांगतानाच सतेज पाटील यांनी राहुल आवाडे (Rahul Awade) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टोला लगावला. “राहुल आवाडे ‘अभी तो बच्चा है’,” असे वक्तव्य करत त्यांनी राहुल आवाडे यांची राजकीय कुवत अद्याप पुरेशी नसल्याचे सूचित केले.

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सतेज पाटील यांनी स्पष्ट केले की, येणारी महापालिका निवडणूक ही महायुती विरुद्ध काँग्रेस अशी नसून थेट कोल्हापूरकर विरुद्ध महायुती अशीच लढाई असेल. शहरातील नागरिकांना सध्या रस्ते, पाणी, आरोग्य आणि नागरी सुविधांबाबत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा जाहीरनामा येत्या ७ तारखेला जनतेसमोर मांडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

राहुल आवाडे यांच्याबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले की, काही जण विनाकारण मोठ्या गप्पा मारत आहेत. राजकारणात केवळ बोलण्याने नव्हे, तर जनतेचा विश्वास आणि अनुभव महत्त्वाचा असतो. “अभी तो बच्चा है” या वक्तव्यातून राहुल आवाडे यांचा राजकीय अनुभव मर्यादित असल्याचा आणि त्यांच्या नेतृत्वाची ताकद अद्याप सिद्ध व्हायची असल्याचा संकेत त्यांनी दिला.

महापालिकेतील प्रशासक राजवटीवर टीका करताना सतेज पाटील म्हणाले की, महायुतीने प्रशासकांच्या माध्यमातून केलेल्या तथाकथित विकासकामांचा आम्ही पंचनामा करणार आहोत. कोल्हापूर शहराची जी दुरवस्था झाली आहे, त्याला थेट महायुती सरकार जबाबदार आहे. “१०० कोटींच्या रस्त्यांपैकी एकही रस्ता पूर्ण झालेला नाही. मात्र मुख्यमंत्री दौऱ्यावर आले की एका रात्रीत रस्ते तयार झाल्याचे दाखवले जाते,” अशी टीकाही त्यांनी केली.

महायुतीतील नेत्यांवर निशाणा साधताना त्यांनी सांगितले की, जर जनतेचा विश्वास खरोखरच त्यांच्यावर असता, तर काही नेत्यांना निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला नसता. राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्यामागे पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर आणि दबावाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात निवडणूक आयोगाने निपक्षपाती आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली असून, आयोगाने चौकशीचे आदेश दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

काँग्रेसकडे जनतेकडून सुमारे १२ हजार सूचना प्राप्त झाल्या असून त्यातील सर्वाधिक तक्रारी रस्त्यांबाबत असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. जनसुराज्य आणि राष्ट्रवादी हे भाजपचीच ‘बी टीम’ असल्याचा आरोप करत, कोल्हापूरकरांची भीती वाटत असल्यामुळेच महायुतीची निर्मिती करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पक्षशिस्तीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, अपक्ष अर्ज भरून माघार न घेतलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मात्र ज्यांनी पक्षासाठी अर्ज मागे घेतले आहेत, त्यांचा आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. “मी भविष्यवाणी करणार नाही, पण कोल्हापूरकर जनतेचा कौल स्पष्ट असेल,” असे म्हणत त्यांनी आपला विश्वास व्यक्त केला.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा