माधुरीने उठवला जिओचा बाजार… #BoycottJio #JioBan #SaveMahadevi

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात सध्या संतापाचं वातावरण आहे. गेली ३३ वर्षं गावाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या ‘माधुरी’ उर्फ महादेवी हत्तीणीला न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरातमधील अंबानी यांच्या वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात रवाना करण्यात आलं आणि गावाच्या काळजाचा तुकडा हरपल्यासारखं सगळ्यांना वाटलं.
गेल्या चार दशकांपासून नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठात वास्तव्य करणारी ही हत्तीण पंचकल्याण पूजा, मिरवणुका आणि धार्मिक सोहळ्यांची आकर्षण ठरली होती. तिचा शांत, शिस्तबद्ध स्वभाव गावकऱ्यांच्या आणि जैन समाजाच्या मनात खोलवर घर करून होता.
मात्र अलीकडे अंबानींच्या वनतारा ट्रस्टने महादेवीवर दावा ठोकत ती त्यांच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी केली होती. या दाव्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन लढाई सुरु झाली आणि अखेर सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलै २०२५ रोजी महादेवीला वनतारामध्ये हलवण्याचे आदेश कायम ठेवले.
भावनांचा उद्रेक, जिओवर बहिष्कार
गावकऱ्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला. महादेवीच्या विरहाने व्यथित झालेल्या गावाने अनोखा मार्ग स्वीकारला — रिलायन्स जिओ नेटवर्कवर बहिष्कार टाकण्याचा! नांदणी गावातील तब्बल ७ हजार नागरिकांनी आपले जिओ सिम बंद करून एअरटेलसह इतर कंपन्यांकडे पोर्टिंग केलं. या निषेधाला मठाशी संबंधित असलेल्या सुमारे ७४३ गावांमधूनही जोरदार पाठिंबा मिळत असून अनेक ठिकाणी ग्रामसभांमध्ये ठराव काढून ‘माधुरीला परत आणा’ अशी मागणी केली जात आहे.
ग्रामस्थांच्या मते, “महादेवी ही केवळ हत्तीण नाही, ती आमची लेक आहे, आमच्या गावाचा आत्मा आहे. अंबानींनी ती आमच्यापासून हिरावून घेतली. त्यामुळेच आम्ही जिओवर बहिष्कार टाकतोय.”
सोशल मीडियावर चळवळ
#SaveMahadevi, #BoycottJio, #JioBan हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत असून, अनेकांनी आपल्या सिमचे स्क्रीनशॉट शेअर करत जिओला रामराम ठोकल्याची घोषणा केली आहे. काही जणांनी तर रिचार्ज बाकी असतानाही जिओ सिम वापरणं बंद केलं आहे.
माणगाव ग्रामपंचायतीचा ठराव
हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने नुकत्याच पार पडलेल्या मासिक सभेत ठराव केला, की “गुजरातला महादेवी पाठवणे म्हणजे लाखो जैन-जैनेतर भाविकांच्या भावना दुखावणे होय. माधुरी हत्तीणीला नांदणी मठात परत आणावे,” अशी मागणी ठरावातून करण्यात आली.
लोकप्रतिनिधींकडून सह्यांची मोहिम
कोल्हापूर जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधींनी माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरू केली आहे. या संदर्भात आता सह्यांची मोहीम देखील राबवली जात आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सह्यांची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. तर खासदार धैर्यशील माने यांनी सुद्धा हा मुद्दा संसदेमध्ये मांडणार असल्याचे म्हटलं आहे.
पुढचा लढा अजून सुरूच…
सध्या महादेवी गुजरातमधील वनतारा केंद्रात असली, तरी नांदणीसह पंचक्रोशीतील गावकऱ्यांचा लढा संपलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करत त्यांनी शांततेने व कायदेशीर मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.
‘जिओचा बाजार’ माधुरीच्या विरहाने उठलेला असला, तरी तो केवळ एका टेलिकॉम कंपनीविरोधात नाही… तो आहे गावाच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि आपल्या लेकीसारख्या हत्तीणीच्या न्यायासाठी उभ्या असलेल्या जिवंत लोकशक्तीचा आवाज!