एसटी चालकाला मारहाण करणं भोवलं; शहापूर पोलिस ठाण्यातील पोलिस निलंबित | ST Driver Beaten Case
Police Constable Suspended for Assaulting ST Bus Driver
शहापूर | एसटी चालकाला मारहाण (ST Driver Beaten Case) केल्याप्रकरणी कोडोली पोलिस (Kodoli Police) ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या शहापूर पोलिस (Shahapur Police) ठाण्याच्या हवालदारास अखेर निलंबित करण्यात आलं आहे. असिफ महंमद कलायगार असं या निलंबित पोलिस कर्मचाऱ्याचं नाव असून, त्याच्यावर ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भातील माहिती पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली.
मारहाण प्रकरण मिटवण्यासाठी काही जणांनी मध्यस्थीचे प्रयत्न केले होते. मात्र अधिकार्यांनी कोणत्याही प्रकारचा दबाव न स्वीकारता गुन्हा दाखल करून थेट अटकेची व निलंबनाची कारवाई केली. यामुळे संपूर्ण पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेच्या दिवशी असिफ कलायगार आपल्या पत्नी हाफिबा यांच्यासह चारचाकी गाडीतून बोरपाडळे मार्गावरून जात होता. त्यावेळी एसटीला वाट दिली नाही, या कारणावरून एसटी चालकाने जाब विचारल्यावर वाद निर्माण झाला. त्यानंतर असिफने एसटी चालकाला शिवीगाळ करत कानशिलात लगावली, गळा पकडून मारहाण केली आणि मी पोलिस आहे, तुला विनयभंगाच्या केसमध्ये अडकवीन, माझी वरपर्यंत ओळख आहे, माझे कोणी वाकडे करू शकत नाही, अशा शब्दांत जीवे मारण्याची धमकी दिली. एवढंच नव्हे तर त्याच्या पत्नीनेही शिवीगाळ करत चप्पल घेऊन मारहाण केली.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर एसटी कर्मचारी संघटनेने कठोर कारवाईची मागणी करत पोलिस ठाण्यावर तक्रार दाखल केली. अखेर कोडोली पोलिसांनी असिफ व त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
या असोशभनीय वर्तनामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचं मानत अप्पर पोलिस अधीक्षक खाटमोडे यांनी असिफ याचं निलंबन केले. निलंबन काळात त्याला दररोज पोलिस मुख्यालयात हजेरी लावणं बंधनकारक असणार आहे.

