Kolhapur News: महापुरातही पाण्याखाली जाणारा महामार्ग वाहतुकीसाठी खुला राहणार; ९८० कोटींचा प्रस्ताव हे काम करणार!

कोल्हापूर | शिरोली सांगली फाटा ते उचगाव दरम्यान सुमारे ३.५५ किमी लांबीचा पिलरवर आधारित उड्डाणपूल व पंचगंगा नदीवरील बास्केट ब्रिज बांधण्याचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. भोपाळ येथील एल. एन. मलविया कंपनीने या कामासाठी तयार केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) पूर्ण झाला असून, यासाठी अंदाजे ९८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. १० जूनपर्यंत हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.
हा प्रकल्प वेळेत मंजूर झाल्यास आणि प्रत्यक्षात काम सुरू झाल्यास महापुरातही पुणे-बंगळुरू महामार्ग वाहतुकीसाठी खुला राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दोन वेळा पाण्याखाली गेलेला महामार्ग
२०१९ आणि २०२१ साली पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे पूल या दरम्यानचा महामार्ग दोनवेळा पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. त्यावेळी रस्त्याची उंची वाढवून त्यावर छोट्या पुलांसारखे गाळे टाकण्याचा पर्याय विचाराधीन होता. मात्र, यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह अडवला गेला असता आणि आजूबाजूच्या गावांना महापुराचा धोका वाढला असता.
पूरग्रस्तांची लढाई आणि गडकरींची ग्रीन सिग्नल
या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त समितीने आंदोलन छेडले आणि ‘पिलरवरच उड्डाणपूल हवा, अन्यथा काम थांबवा’ असा स्पष्ट इशारा दिला. यानंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन ही मागणी मांडली. २३ डिसेंबर २०२३ रोजी गोव्यात झालेल्या बैठकीत गडकरी यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला, तसेच वाढीव प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रस्तावित उड्डाणपूलाची रचना
- एकूण लांबी : ३,५५० मीटर
- पिलरवरील मुख्य पूल : २,४७५ मीटर
- सेवामार्ग लांबी : ५,८२६ मीटर
- रस्त्याची रुंदी : ३० मीटर
वाहतुकीसाठी रॅम्प रस्ते :
- सांगलीहून येण्यासाठी – २७० मीटर रॅम्प, १२० मीटर मर्जिंग रस्ता
- गांधीनगरहून महामार्गावर येण्यासाठी – १७१ मीटर रॅम्प
- कोल्हापूरहून येण्यासाठी – ५९० मीटर रस्ता
- कोल्हापूरला जाण्यासाठी – १३४५ मीटर रस्ता
(सर्व रस्त्यांची रुंदी : ८.५ मीटर)
पुढील टप्पे
प्रकल्प अहवाल केंद्र सरकारकडे सादर झाल्यानंतर, मंजुरी मिळवून टेंडर प्रक्रिया पार पडेल आणि नवीन ठेकेदार नेमून प्रत्यक्ष काम सुरू होईल. कागल-सातारा सहापदरीकरणाचे काम सध्या सुरू असून, हा उड्डाणपूल त्याचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे.
स्थानिकांचे सकारात्मक मत
शशिकांत खवरे (माजी सरपंच) म्हणाले, “हा पूल लवकरात लवकर झाला पाहिजे. यामुळे पूरपरिस्थितीत होणारा त्रास कमी होईल, वाहतुकीची कोंडी आणि अपघात टळतील.”
पद्मजा करपे (सरपंच, शिरोली) यांनी सांगितले, “महापुरामुळे शिरोलीसह अनेक गावांना त्रास सहन करावा लागत होता. पिलरवरचा पूल झाल्यास संपूर्ण भागाला दिलासा मिळेल.”


