14 गुन्हे दाखल तरीही धनंजय मुंडेंनी केले Walmik Karad ला लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष? धक्कादायक माहिती समोर
Walmik Karad | बीडच्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मिक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडवर तब्बल 14 गुन्हे दाखल असून देखील तो बीड जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे.
14 गुन्हे दाखल असूनही अध्यक्षपद कायम
वाल्मिक कराडवर तब्बल 14 गुन्हे दाखल असूनही त्याला लाडकी बहीण योजनेचा अध्यक्षपद देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, खंडणीच्या गुन्ह्यात शरण आलेला कराड अद्यापही या योजनेच्या अध्यक्षपदी आहे.
धनंजय मुंडे यांच्या शिफारसीवर नियुक्ती
ही नियुक्ती मंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारसीवर झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनीही याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राजकीय वातावरण तापले
या प्रकरणामुळे बीडसह राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. विरोधकांनी धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर निशाणा साधत हा मुद्दा संसदेत आणि विधानसभेमध्ये उचलण्याचे संकेत दिले आहेत. तसेच या प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाची नवी मालिका सुरू झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावरून राज्य सरकारला विरोधकांनी चांगलेच घेरले आहे.
धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा
राजकीय तणाव वाढत असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


