कोण आहे Datta Gade? माजी सरन्यायाधीश प्रतिक्रिया देताना म्हणाले, “निर्भया बलात्कार प्रकरणानंतर…”
पुणे शहरातील अतिशय गजबजलेल्या स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला आज शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी १३ पथके, श्वान पथक आणि ड्रोनचा वापर केला. अखेर, आज पहाटे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
दत्ता गाडे कोण आहे? who is datta gade
दत्ता गाडे याच्याविरोधात पुणे आणि अहिल्यानगर पोलीस ठाण्यात अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर सोनसाखळी चोरीचे देखील आरोप आहेत. २०१९ मध्ये एका चोरीच्या प्रकरणात जामिनावर सुटलेल्या गाडेवर २०२४ मध्ये पुण्यात पुन्हा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य असून, त्याला आठ वर्षांचा मुलगा आहे. त्याचे आई-वडील शेतीत काम करतात, तर त्याची पत्नी काही वर्षांपूर्वी पोलीस भरतीसाठी प्रयत्नशील होती.
डी. वाय. चंद्रचूड यांची प्रतिक्रिया
या घटनेवर भारताचे माजी मुख्य सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी भाष्य करताना सांगितले की, “निर्भया बलात्कार प्रकरणानंतर कायद्यात अनेक सुधारणा केल्या गेल्या. मात्र, केवळ कायद्याच्या माध्यमातून अशा घटना रोखता येणार नाहीत. मोठ्या प्रमाणात महिला शिक्षण आणि नोकरीसाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे महिलांसाठी असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी योग्य रीतीने झाली पाहिजे.”
दत्ता गाडेचा धक्कादायक दावा
चौकशीदरम्यान, दत्ता गाडे याने एक धक्कादायक दावा केला आहे. “मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे संबंध परस्पर संमतीने झाले,” असे त्याने सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, आरोपीला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेनंतर सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.


