Hello KolhapurNews

“खड्यातून प्रवास नागरिकांचा, डांबर मात्र गुळगुळीत रस्त्यांवर!” | Kolhapur Road Development

कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि उपनगरांतील अनेक रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना, सुस्थितीत असलेल्या रस्त्यांवरच पुन्हा डांबरीकरण करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः ताराबाई रोडवरील (Kolhapur Road Development) सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये खड्डेमय आणि बकाल रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त असताना निधीचा वापर नेमका कुठे आणि कसा केला जात आहे, याबाबत नागरिकांकडून शंका उपस्थित होत आहेत.

महालक्ष्मी मंदिर ते रंकाळा चौपाटी कमान या ताराबाई रोडवरील मुख्य रस्त्याच्या कामासाठी जवळपास तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या संपूर्ण मार्गावर केवळ कपिलतीर्थ मार्केटपासून तटाकडील तालीमपर्यंतचा साधारण 40 मीटरचा भाग काही प्रमाणात खराब झालेला असल्याचे सांगितले जाते. त्याव्यतिरिक्त बहुतांश रस्ता सुस्थितीत असूनही संपूर्ण मार्गाचे डांबरीकरण वेगाने सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या भागांना प्रत्यक्षात तातडीच्या दुरुस्तीची गरज आहे, त्या भागांकडे दुर्लक्ष करून चांगल्या रस्त्यांवर खर्च का केला जात आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

शहरातील आणि उपनगरांतील अनेक भागांमध्ये गेल्या 20 वर्षांपासून रस्त्यांची मोठी कामे झालेली नाहीत. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात घडले असून काही नागरिकांना जीवदेखील गमवावा लागला आहे. खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी अनेकदा निवेदने दिली, आंदोलने केली आणि रास्ता रोकोसारख्या आंदोलनांचाही मार्ग अवलंबला. तरीही त्यांच्या मागण्यांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

याच पार्श्वभूमीवर सुस्थितीत असलेल्या रस्त्यांवर पुन्हा डांबरीकरण होत असल्यामुळे नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. सार्वजनिक निधीचा योग्य वापर होणे अपेक्षित असताना, प्राधान्यक्रम ठरवताना प्रत्यक्ष गरज असलेल्या भागांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.

दरम्यान, गांधी मैदान परिसरातून दुधाळीकडे वळवण्यात आलेल्या सांडपाण्याच्या नाल्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तसेच साकोली कॉर्नर चौक परिसरात या रस्त्यावर क्रॉस नाला जोडण्याचे महत्त्वाचे काम प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत त्या भागातही डांबरीकरण करण्यात आले आहे. भविष्यात क्रॉस नाल्याचे काम सुरू झाल्यानंतर नव्याने केलेला रस्ता पुन्हा खोदावा लागणार असल्याने निधीचा अपव्यय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उभा मारुती चौक ते साकोली कॉर्नर परिसरातील नागरिकांनी प्रथम सांडपाण्याचे गटार आणि नाल्यांची कामे पूर्ण करावीत, त्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी मागणी केली आहे. सध्या या भागात धूळ, चिखल आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे नागरिकांचे हाल होत असून प्रशासनाने प्राधान्यक्रम ठरवून आवश्यक त्या भागांतील रस्ते आणि नागरी सुविधांची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा