शिरोली MIDCत एका रात्रीत 4 कंपन्या फोडल्या; 15.38 लाखांचा मुद्देमाल लंपास …| Kolhapur News Shiroli MIDC Theft Case
Four firms targeted in a daring overnight burglary at Shiroli MIDC, causing losses exceeding ₹15 lakh.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एमआयडीसी परिसरात एकाच रात्रीत चार कंपन्यांचे कुलूप तोडून तब्बल १५ लाख ३८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी (Kolhapur News Shiroli MIDC Theft Case) पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे औद्योगिक वर्तुळात खळबळ उडाली असून, उद्योजकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरोली एमआयडीसी येथील पहिल्या फाट्यावर असलेल्या ‘दीप टॉवर्स’ इमारतीमध्ये ही चोरी घडली. या इमारतीत ‘दीप सेल्स अँड सर्व्हिसेस’, ‘दीप इंजिनिअरिंग सर्व्हिसेस’, ‘मेटासिस लॅब’ आणि ‘शिवम इंडस्ट्रिज’ या चार कंपन्यांची कार्यालये व स्टोअर विभाग आहेत. फिर्यादी सुमीत दिलीप पवार (वय ३९, रा. आर. के. नगर, कोल्हापूर) व त्यांचे भाऊ अक्षय पवार यांच्या मालकीच्या या कंपन्या असून, त्या एमआयडीसी परिसरातील विविध उद्योगांना कारबाईड इन्सर्ट आणि टूल्स पुरवण्याचे काम करतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजल्यापासून गुरुवार ४ जून २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरट्यांनी ही चोरी केली. चोरट्यांनी सर्वप्रथम इमारतीच्या मुख्य शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर स्टोअर रूमचे लॉक तोडून तेथील अत्यंत महागडे व औद्योगिक वापरातील मौल्यवान साहित्य चोरी करून नेले. चोरीची पद्धत पाहता चोरट्यांनी नियोजनबद्धरीत्या आणि शिताफीने ही कारवाई केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
चोरीमध्ये ‘दीप सेल्स अँड सर्व्हिसेस’ या कंपनीमधील विविध आकारांचे सुमारे ३ हजार कारबाईड इन्सर्ट व टूल्स चोरीस गेले असून त्यांची किंमत १० लाख २१ हजार रुपये इतकी आहे. तसेच ‘दीप इंजिनिअरिंग सर्व्हिसेस’मधून ६५० कारबाईड इन्सर्ट व टूल्स तसेच २४ ड्रील्स आणि एंडमिल्स असा २ लाख १७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. याशिवाय ‘मेटासिस लॅब’ आणि ‘शिवम इंडस्ट्रिज’ या कंपन्यांमधून कॉपर रॉड, कॉपर पट्ट्या आणि कॉपर स्क्रॅप असे एकूण ४१ नग साहित्य, अंदाजे २०० किलो वजनाचे तांबे चोरीस गेले असून त्याची किंमत सुमारे ३ लाख रुपये आहे.
गुरुवारी सकाळी कर्मचारी कामावर आल्यानंतर कार्यालयांचे कुलूप तुटलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आत तपासणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साहित्य चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सुमीत पवार यांनी तात्काळ शिरोली एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मोठ्या चोरीच्या घटनेमुळे शिरोली एमआयडीसीतील उद्योजकांमध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा घटना रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी उद्योग क्षेत्रातून होत आहे.
दरम्यान, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (SMAC) परिसरातील पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका दुकानात यापूर्वीही दोन वेळा धाडसी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. मात्र त्या घटनांना काही महिने उलटूनही पोलिसांना अद्याप कोणताही ठोस मागमूस लागलेला नाही. तसेच परिसरातील इतर अनेक दाखल आणि अदाखल चोरीच्या घटनांचाही तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असून, या नव्या चोरीच्या प्रकरणाचा तपास कितपत वेगाने आणि प्रभावीपणे होतो याकडे उद्योजकांचे लक्ष लागले आहे.

