Hello Kolhapur

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात हजारोंचा विराट मोर्चा; प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी | Shaktipeeth Highway Kolhapur Protest

Farmers' Massive March in Kolhapur Demands Cancellation of Shaktipeeth Highway

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या विरोधात मंगळवारी कोल्हापुरात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा (Shaktipeeth Highway Kolhapur Protest) काढत सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘लढा आमच्या हक्काचा, बळीराजाच्या अस्तित्वाचा’ तसेच ‘शेतकरी विरोधी महायुती सरकारचा निषेध असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शेतकऱ्यांच्या मते हा महामार्ग गरजेचा नसून हजारो एकर सुपीक शेती उद्ध्वस्त करणारा असल्याने तो तातडीने रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.

शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाची सुरुवात दसरा चौकातून झाली. त्यानंतर व्हीनस कॉर्नरमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. उन्हाचा तडाखा असतानाही महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला. यामध्ये आमदार जयंत पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार संपतबापू पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच विजय देवणे, संजय पोवार, गिरीश फोंडे, ए. वाय. पाटील, धैर्यशील पाटील कौलवकर, गोपाळराव पाटील, राहुल देसाई, आर. वाय. पाटील, अप्पी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. सकाळी सुमारे पावणेबाराच्या सुमारास सुरू झालेला हा मोर्चा दुपारी पावणेचार वाजेपर्यंत चालला. तब्बल चार तास हे आंदोलन सुरू होते.

मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या खर्चावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून साधारणपणे प्रति किलोमीटर ५४ कोटी रुपयांचा खर्च होत असताना शक्तिपीठ महामार्गासाठी प्रति किलोमीटर ११७ कोटी रुपये खर्च दाखविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. हा प्रकल्प केवळ कंत्राटदारांच्या हितासाठी राबवला जात असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात शक्तिपीठ महामार्गासाठी प्रस्तावित निधी लोककल्याणकारी कामांसाठी वापरण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रकल्पाबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून संपूर्ण माहिती जनतेसमोर ठेवावी, जमिनींचा सर्व्हे तात्काळ थांबवावा आणि महामार्गाच्या अलाईनमेंटबाबत सरकारने लोकप्रतिनिधींशी चर्चा करून स्पष्ट भूमिका मांडावी, अशा मागण्या करण्यात आल्या. याशिवाय एजंट आणि काही अधिकाऱ्यांकडून मोबदल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करत अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणीही करण्यात आली.

दरम्यान, मोर्चात सहभागी होण्यासाठी रेडा घेऊन आलेल्या एका शेतकऱ्याला पोलिसांनी विरोध केला. यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ वादावादी झाली. पोलिसांनी संबंधित शेतकरी आणि रेड्याला ताब्यात घेतले होते. मात्र नंतर त्यांची मुक्तता करण्यात आली. या घटनेचा संदर्भ देत आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पोलिसांच्या कारवाईवर टीका केली. “पोलिसांचा काय भरवसा नाही, रेड्याला पकडून गुवाहाटीला कापायला नेतील,” अशी मिश्कील टिप्पणी करण्यात आल्यानंतर रणरणत्या उन्हातही आंदोलनस्थळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात उभारलेला हा मोर्चा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाढत्या असंतोषाचे प्रतीक मानला जात असून, या आंदोलनामुळे राज्य सरकारसमोर नव्या राजकीय आणि सामाजिक प्रश्नांची उभारणी झाली आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा