Hello Kolhapur

गोकुळ निवडणुकीत बोगस ठरावांवर प्रशासनाचा वॉच; दोषींवर कारवाईचा इशारा… | Gokul Election Krishna Thakare

Authorities tighten scrutiny as political tensions rise over representative resolutions ahead of the Gokul election.

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दूध संस्थांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून प्रतिनिधी ठरावांच्या प्रक्रियेवरून अनेक संस्थांमध्ये मतभेद आणि गटबाजी उफाळून येत आहे. या पार्श्वभूमीवर बनावट कागदपत्रे, खोट्या सह्या, बनावट शिक्के किंवा बोगस ठराव ((Gokul Election Krishna Thakare) दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. अशा प्रकारचे बोगस ठराव दाखल झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्राधिकृत अधिकारी तथा सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी दिला आहे.

दूध संस्था प्रतिनिधींच्या ठरावांवरून अनेक संस्थांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. कोणत्या गटाच्या किंवा व्यक्तीच्या नावाने प्रतिनिधी ठराव सादर करायचा यावरून संचालक मंडळांत मतभेद निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी दोन वेगवेगळ्या गटांकडून स्वतंत्र ठराव दाखल करण्याची शक्यता असल्याने दुबार ठरावांची संख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या परिस्थितीचा निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. ठरावांची पडताळणी करताना कोणताही ठराव बोगस असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ठराव एकत्रीकरणाच्या प्रक्रियेत सुसूत्रता राखण्यासाठी तसेच अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी काही उपाययोजना राबविण्याचा प्रस्ताव सहायक निबंधक कार्यालयाने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्याकडे पाठविला होता. या उपाययोजनांना मंजुरी मिळाल्यानंतर प्रशासनाने आवश्यक नियोजन सुरू केले आहे.

ठरावांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण अधिकच तापल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गुरुवारी शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथे दोन गटांमध्ये ठरावावरून वाद झाल्याची घटना घडली. मंगळवार, १६ जूनपासून मोठ्या प्रमाणात ठराव दाखल करण्यासाठी संस्था प्रतिनिधी सहायक निबंधक कार्यालयात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यालय परिसरात वादावादी किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन सोमवारपासून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कार्यालयात पोलिस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सहायक निबंधक कार्यालयात शुक्रवारी दिवसभरात १७ ठराव दाखल झाले. आतापर्यंत एकूण ४५ ठराव प्राप्त झाले असून त्यामध्ये आजरा तालुक्यातून ३, करवीरमधून १४, गडहिंग्लजमधून ८, चंदगडमधून ७, भुदरगड, राधानगरी आणि शाहूवाडी तालुक्यांतून प्रत्येकी २, तर शिरोळ आणि गगनबावडा तालुक्यांतून प्रत्येकी १ ठराव प्राप्त झाला आहे.

ठराव स्वीकारण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. १२ तालुक्यांसाठी एकूण १८ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण प्रक्रियेसाठी ४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. करवीर, कागल, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी आणि शाहूवाडी या तालुक्यांसाठी प्रत्येकी दोन टेबल तर चंदगड, गडहिंग्लज, आजरा, गगनबावडा, हातकणंगले आणि शिरोळ या तालुक्यांसाठी प्रत्येकी एक टेबल उपलब्ध राहणार आहे.

ठराव स्वीकारण्याची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी निश्चित करण्यात आली आहे. शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ठराव स्वीकारले जाणार नाहीत, असेही सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ठराव दाखल करण्यासाठी काही नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. ठराव सादर करणारी व्यक्ती संबंधित संस्थेची पदाधिकारी, सचिव किंवा सभासद असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ओळखीचा मूळ पुरावा आणि त्याची छायांकित प्रत सोबत आणणे बंधनकारक राहणार आहे. एका व्यक्तीकडून एका संस्थेचाच ठराव स्वीकारला जाईल. मुदत संपल्यानंतर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष आणलेले ठराव स्वीकारले जाणार नाहीत. प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली असून संबंधित तालुक्याच्या कक्षातच ठराव स्वीकारले जाणार आहेत. तसेच ठराव दाखल करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींची तालुकानिहाय स्वतंत्र नोंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा