प्रयाग चिखलीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरफोड्यांत ११ तोळे सोने, लाखोंचा ऐवज लंपास | Kolhapur Crime Prayag Chikhli
Burglars target two locked houses in Prayag Chikhli, stealing gold ornaments and cash worth lakhs.

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी घरफोडी (Kolhapur Crime Prayag Chikhli) करत दोन कुलूपबंद घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये सुमारे ११ तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी एका ब्युटी पार्लरचे दुकान आणि कासाराचे दुकान फोडण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरदार गल्ली परिसरातील हरी वसंत झिरंगे हे आपल्या कुटुंबासह तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. तसेच लक्ष्मण लोहार हे सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेले होते. या दोन्ही घरांमध्ये कोणीही नसल्याची माहिती मिळाल्यानंतर चोरट्यांनी संधी साधून घरांची कुलपे तोडली. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी तिजोऱ्या फोडून त्यातील मौल्यवान ऐवज चोरून नेला.
हरी वसंत झिरंगे यांच्या घरातून सुमारे ११ तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे सांगण्यात आले आहे. तर लक्ष्मण लोहार यांच्या घरातील तिजोरी फोडून चोरट्यांनी २० हजार रुपये रोख रक्कम आणि अंदाजे एक लाख रुपयांचा इतर ऐवज लंपास केला. त्यामुळे दोन्ही कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. करवीर विभागाचे डीवायएसपी सुजितकुमार क्षीरसागर आणि पोलिस निरीक्षक रवींद्र कळंबकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तपासासाठी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाची मदत घेण्यात आली असून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे.
प्राथमिक तपासात चोरटे चारचाकी वाहनातून आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चोरी करण्यापूर्वी त्यांनी परिसरातील चार ते सहा घरांच्या बाहेरील कड्या लावून घेतल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे घरातील नागरिकांना बाहेर पडता येऊ नये आणि चोरीदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी हा डाव आखण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीने मोठ्या गाजावाजात गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. मात्र, बसविल्यानंतर काही दिवसांतच बहुतांश कॅमेरे बंद पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चोरीच्या तपासात महत्त्वाचे पुरावे मिळविण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ग्रामपंचायत प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याची गरज अधोरेखित केली आहे.
सध्या पोलिसांकडून परिसरातील संशयित हालचालींची माहिती गोळा केली जात असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे प्रयाग चिखली गावातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

