Hello Kolhapur

“कोल्हापूर गॅझेटियर लागू झाल्यास राज्यातील एकही मराठा कुणबी दाखल्यापासून वंचित राहणार नाही : मनोज जरांगे” | Kolhapur Gazetteer Manoj Jarange

Kolhapur Gazetteer Push Gains Momentum as Jarange Assures Efforts for Kunbi Certificates

कोल्हापूर : कोल्हापूर गॅझेटियरची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील एकही मराठा समाजबांधव कुणबी दाखल्यापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करत मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे (Kolhapur Gazetteer Manoj Jarange) यांनी ते लागू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या जरांगे यांनी न्यू पॅलेस येथे खासदार शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ‘कोल्हापूर गॅझेटियर’ या विषयावर सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत कोल्हापूर गॅझेटियरमधील मराठा-कुणबी संदर्भातील नोंदी, मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचे दर्शविणारे विविध ऐतिहासिक पुरावे तसेच त्याआधारे मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याच्या प्रक्रियेबाबत विस्तृत विचारमंथन करण्यात आले. यावेळी खासदार शाहू महाराज यांनी कोल्हापूर गॅझेटियरचा आधार घेऊन मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले कायदेशीर मार्गाने देण्यात आल्यास त्या प्रमाणपत्रांची वैधता टिकून राहील, असे मत व्यक्त केले.

बैठकीदरम्यान ॲड. बाबा इंदुलकर यांनी कोल्हापूर गॅझेटियरशी संबंधित सर्व पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्याची माहिती दिली. तर दिलीप देसाई यांनी सध्या अनेक कुणबी दाखल्यांना जात पडताळणी समितीकडून वैधता मिळण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे जात वैधता समिती बरखास्त करून तहसीलदारांना अधिकार देण्याची मागणी त्यांनी केली. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

बैठकीदरम्यान खासदार शाहू महाराज यांनी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. यावेळी मनोज जरांगे यांनीही डॉ. जाधव यांच्याशी चर्चा केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील, पुरुषोत्तम खेडेकर, शशिकांत पवार आणि डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सुरुवातीच्या काळात उभारलेला लढा महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत, आता तेच कार्य आपण जोमाने पुढे नेत असल्याचे डॉ. जाधव यांनी जरांगे यांना सांगितले. सध्या आपण बाहेरगावी असल्याचे समजताच, आपली भेट घेण्यासाठी पुन्हा कोल्हापूरला आवर्जून येऊ, असे आश्वासन जरांगे यांनी त्यांना दिले.

याच कार्यक्रमात खासदार शाहू महाराज यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या ‘सिंहायन’ या आत्मचरित्राची प्रत मनोज जरांगे यांना भेट दिली. मराठा आरक्षण चळवळीसह महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीचे साक्षीदार असलेल्या डॉ. जाधव यांच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडविणारे हे आत्मचरित्र प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. भेट म्हणून मिळालेल्या या पुस्तकाची जपणूक करून ते घरी घेऊन जाणार असल्याचे सांगत जरांगे यांनी आपल्या सहकाऱ्याला त्याबाबत विशेष सूचना दिल्या.

कोल्हापूर गॅझेटियर लागू करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाज गेल्या काही काळापासून सातत्याने प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, गॅझेटियरच्या आधारे मराठा समाजाला कुणबी दाखल्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढील काळात अधिक व्यापक प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा