महाराष्ट्रात भीषण पाणीसंकट! १६ धरणे कोरडी, उरलेला साठा केवळ पिण्यापुरता… | Maharashtra Water Crisis
Maharashtra Faces Severe Water Crisis as Reservoir Levels Drop Sharply

कोल्हापूर : राज्यातील वाढत्या उष्णतेमुळे आणि पाण्याच्या झपाट्याने होत असलेल्या बाष्पीभवनामुळे धरणांतील पाणीसाठा चिंताजनकरीत्या घटला असून राज्यातील तब्बल १६ मोठी धरणे (Maharashtra Water Crisis) पूर्णपणे कोरडी पडली आहेत. सध्या अनेक धरणांमध्ये केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक इतकाच साठा शिल्लक राहिल्याने आगामी काळात पाण्याचा वापर अत्यंत जपून आणि काटकसरीने करण्याची गरज निर्माण झाली आहे.
राज्यात मोठी, मध्यम आणि लहान मिळून एकूण ३०२८ धरणे असून त्यांची एकत्रित पाणी साठवण क्षमता १७१५ टीएमसी इतकी आहे. मात्र सध्या या सर्व धरणांमध्ये मिळून केवळ ३५३ टीएमसी एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्यातील सुमारे १४ कोटी लोकसंख्येला वर्षभरासाठी पिण्याच्या व घरगुती वापराच्या पाण्याची गरज सुमारे २७० टीएमसी इतकी आहे. याशिवाय उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे धरणांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने उपलब्ध पाणीसाठ्यावर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे.
यंदा मान्सूनचे आगमन नेमके कधी होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने चिंता अधिक वाढली आहे. त्यातच अल निनोच्या प्रभावामुळे संभाव्य दुष्काळाची शक्यता व्यक्त केली जात असल्याने सध्याचा पाणीसाठा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार धरणांमधील उर्वरित पाणी प्रामुख्याने पिण्याच्या आणि घरगुती गरजांसाठीच राखून ठेवावे लागणार असल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यातील धरणांमध्ये सुमारे ३१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र यंदा तो घटून केवळ २४ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यभर झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे धरणांमध्ये अतिरिक्त पाणी जमा झाले होते. यंदा मात्र मान्सूनपूर्व पावसाने अपेक्षित प्रमाणात हजेरी लावली नसल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी झालेला दिसून येत आहे.
विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार केला असता पुणे विभागात सर्वाधिक ७७ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. त्यानंतर मराठवाडा विभागात ७० टीएमसी, नागपूर विभागात ६० टीएमसी, अमरावती विभागात ५२ टीएमसी, नाशिक विभागात ५२ टीएमसी तर कोकण विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ ३९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. या सर्व विभागांतील उपलब्ध पाणीसाठा प्रामुख्याने पिण्याच्या गरजांसाठी राखून ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, राज्यातील एकूण १६ धरणे पूर्णपणे कोरडी पडली आहेत. यामध्ये उजनी, लोणावळा, घोड, पिंपळगाव जोगे, भाम, शिवनी, सिना-कोळेगाव, तागरखेडा, लिंबाळा, गुंजारगा, किनवट, सिद्धेश्वर, सिरसमार्ग, बोरगाव-अंजनपूर आणि खडकपूर्णा या धरणांचा समावेश आहे. याशिवाय राज्यातील काही अन्य धरणांमध्ये अवघा एक ते दहा टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यांत पाणी व्यवस्थापनाचे मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीने आणि काटकसरीने करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

