शेतकऱ्यांनो Farmer ID काढा; अन्यथा मिळणार नाहीत ‘हे’ फायदे
3.24 lakh farmers yet to register; Kolhapur Collector urges completion of Farmer ID process by May 31

कोल्हापूर, दि. १५: येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे फार्मर आयडी (Farmer ID) ३१ मेपूर्वी तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. ॲग्रीस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
आतापर्यंत जिल्ह्यातील ७ लाख ४१ हजार ५५० शेतकऱ्यांपैकी ४ लाख १७ हजार १७४ शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली असून, उर्वरित ३.२४ लाख शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडीसाठी नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी घेणे आता बंधनकारक आहे. या आयडीशिवाय पीएम किसान योजना, आपत्तीग्रस्त शेतीची नुकसान भरपाई, शेती कर्ज आणि विमा, तसेच विविध कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने त्वरीत नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सेल्फ व कॅम्प मोडद्वारे गावागावात मोहीम राबवून हे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
बैठकीला उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, शक्ति कदम, तहसीलदार स्वप्नील पवार तसेच तालुकास्तरीय कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि कृषी अधिकारी यांच्याशी संवाद साधण्यात आला.
गावपातळीवर जनजागृतीचे आदेश
जिल्हाधिकारी येडगे यांनी शेतकऱ्यांना फार्मर आयडीबाबत जागरूक करण्यासाठी गावपातळीवर सोसायट्या, दूध संकलन केंद्रे, स्वस्त धान्य दुकानांमध्ये फलक लावण्याचे निर्देश दिले. याशिवाय, स्वयंसेवकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर नोंदणी करून मोबाईलद्वारे सेल्फ मोडमध्ये आयडी तयार करण्यावर भर देण्याचेही आवाहन केले.
सीएससी केंद्रांनाही गती देण्याच्या सूचना
“सीएससी केंद्रांद्वारेही विशेष मोहिम राबवा. प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना नोंदणीसाठी प्रवृत्त करा,” असे सांगत त्यांनी तहसीलदारांना तालुका कृषी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या समन्वयातून सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश दिले.
जिल्हास्तरावरून यासंदर्भात दररोज आढावा घेतला जाणार असून प्रत्येक गावातील प्रगतीची नोंद ठेवली जाणार आहे.
तालुकानिहाय उर्वरित शेतकरी संख्येचा आढावा (31 मे पूर्वी काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट):
| तालुका | एकूण शेतकरी | नोंदणी पूर्ण | उर्वरित शेतकरी |
|---|---|---|---|
| करवीर | 1,19,391 | 56,558 | 62,833 |
| गगनबावडा | 11,283 | 6,468 | 4,815 |
| पन्हाळा | 65,374 | 39,017 | 26,357 |
| शाहुवाडी | 50,499 | 30,736 | 19,763 |
| राधानगरी | 60,103 | 35,344 | 24,759 |
| कागल | 75,823 | 43,664 | 32,159 |
| भुदरगड | 46,006 | 27,230 | 18,776 |
| आजरा | 37,079 | 24,888 | 12,191 |
| हातकणंगले | 92,852 | 42,739 | 50,113 |
| शिरोळ | 63,035 | 39,735 | 23,300 |
| गडहिंग्लज | 65,456 | 38,424 | 27,032 |
| चंदगड | 54,649 | 32,371 | 22,278 |
जिल्ह्यातील सरासरी प्रगती: सुमारे ५६.३% शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली असून उर्वरितांसाठी व्यापक मोहीम राबवण्यात येणार आहे.

