बातम्या

Accident Case : कोल्हापूरच्या महिलेसह दोघींचा मृत्यू; पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, सहा जण गंभीर जखमी

खोपोली | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवारी (२५ मे) दुपारी साडेचारच्या सुमारास खोपोली फूड मॉलजवळ भीषण अपघात (Accident Case) घडला. भरधाव ट्रेलरने दोन बस आणि चार कारना जबर धडक दिल्याने मोठी जीवितहानी झाली. या दुर्घटनेत स्विफ्ट कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये कोल्हापूर आणि सांगलीच्या दोन महिलांचा समावेश आहे.

मृतांमध्ये अश्विनी अक्षय हळदणकर (वय ३८, रा. कोल्हापूर) आणि श्रीया संतोष अवताडे (वय १७, मूळ रा. तासगाव-सांगली, सध्या रा. घाटकोपर) यांचा समावेश आहे. हे दोघे स्विफ्ट कारमधून प्रवास करत होते. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये सारिका अवताडे (घाटकोपर), वसुधा विजय जाधव (४०), सारिका विजय जाधव (९), अविनाश विजय जाधव (३) आणि अक्षय हळदणकर यांचा समावेश असून हे सर्व कोल्हापूरचे रहिवासी आहेत. सर्व जखमींवर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातावेळी एक्सप्रेस वेवर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्याचदरम्यान पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या एका भरधाव ट्रेलरने नियंत्रण गमावून इर्टिगा, सियाझ, हुंडाई कार, एसटी बस आणि शेवटी स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली. ट्रेलरच्या धडकेत स्विफ्ट कार थेट पुढे उभ्या खासगी बसखाली घुसली. या अपघातात कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, आयआरबीची देवदूत पथक, तसेच हेल्प फाउंडेशनची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. जखमींना तत्काळ उपचारासाठी पनवेलच्या रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर काही काळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. मात्र, क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढत वाहतूक काही वेळात सुरळीत करण्यात आली. या अपघातामुळे कोल्हापूर व सांगली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Show More
Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा