बातम्याहॅलो कोल्हापूर

Kolhapur Accident | शिरोली एमआयडीसी येथे ३ वाहनांचा भीषण अपघात : १ जागीच ठार, १५ जखमी

Private sleeper bus crashes into parked container; car hits bus from behind - One Killed, 15 Injured

कोल्हापूर (Kolhapur Accident) | पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरोली औद्योगिक वसाहतीतील मेनन पिस्टन्स कंपनीसमोर शनिवारी (२४ मे) सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास खासगी बस, कंटेनर आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करत असताना खासगी स्लीपर कोच बसने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. त्यानंतर मागून आलेली कार बसला धडकली. या अपघातात बसमधील क्लिनर जागीच ठार झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. कारमधील तिघे एअरबॅग्समुळे थोडक्यात बचावले.

अपघाताची माहिती अशी :
पुणे – निगडीहून बेळगावकडे ३६ प्रवाशांना घेऊन निघालेली खासगी स्लीपर कोच बस (एमएच ०९ जीजे ६७५९) शिरोली एमआयडीसीमधील मेनन पिस्टन्स कंपनीसमोर आली असता चालक संदीप शंकरराव चांगभले (वय ५४, रा. हरीनगर, निपाणी) याने अन्य वाहन ओव्हरटेक करताना नियंत्रण गमावले. रस्त्याच्या कडेला टायरची हवा कमी झाल्याने थांबलेल्या कंटेनर (एमएच ४६ एआर ५१८२) ला बसने पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेत बसचा क्लिनर सौरभ ऊर्फ रोहन अजित कुलकर्णी (वय ३०, रा. खडकलाट, चिकोडी) जागीच ठार झाला. बस अचानक थांबल्यामुळे मागून येणाऱ्या कारने (एमएच ५० यु ३७६५) बसला जोरदार धडक दिली.

अपघातातील जखमी प्रवासी :

  1. प्रवीण भैरू पुमनाचे (वय 33, निपाणी)
  2. संदीप शंकरराव चलमले (वय 53)
  3. नारायण वाट्लेकर (वय 23)
  4. महेश पाटील (वय 30)
  5. ऐश्वर्या गुडकर (वय 26)
  6. सोनाली मोरे (वय 2)
  7. देवराज मोरे (वय 28)
  8. स्वदेश देसाई (वय 25)
    यांच्यासह आणखी काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, गंभीर जखमींवर कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींना खासगी रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे.

कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले
कारचा चालक राजेश भिमराव सुतार (वय ४६, रा. संभूर, ता. पाटण, जि. सातारा) हे सरनोबतवाडी येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पेशंट किसन जाधव व त्यांचा मुलगा महेश जाधव यांना घेऊन जात होते. अपघाताच्या क्षणी कारचे वेग ६५ किमी/तास होता, तर बसचा वेग ७०-७५ किमी/तास असल्याचा अंदाज आहे. कारमधील एअरबॅग्स वेळेवर उघडल्याने तिघेही सुरक्षित राहिले.

अपघातामुळे वाहतूक विस्कळीत
या अपघातामुळे पुणे – बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker