बातम्याहॅलो कोल्हापूर

कोल्हापुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल 8 कोटींचा गंडा; विश्वास नांगरे पाटलांच्या नावाचा गैरवापर करत रिलायन्सच्या निवृत्त अधिकाऱ्याला लुबाडले | Digital Arrest in Kolhapur

कोल्हापूर | कोल्हापुरात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सायबर फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येत आहेत. कोल्हापुरात निवृत्त प्राध्यापिकेला डिजिटल अरेस्टची (Digital Arrest in Kolhapur) भीती दाखवून तीन कोटींचा गंडा घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणात तब्बल ८ कोटीला गंडा घालण्यात आला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजमधून सहाय्यक उपाध्यक्ष या पदावरून निवृत्त झालेल्या दत्तात्रय गोविंद पाडेकर (वय ७५, रा. देवकर पाणंद रोड, कोल्हापूर) यांना सायबर गुन्हेगारांनी ७ कोटी ८६ लाख २१ हजार ६९६ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फसवणुकीचा प्रकार २४ मे २०२५ रोजी सुरू झाला आणि त्यानंतर सलग काही दिवस पाडेकर यांच्याशी सायबर भामटे संपर्कात राहिले.

Digital Arrest in Kolhapur

‘डिजिटल अरेस्ट’, ‘देशद्रोहाचा गुन्हा’, ‘ईडी आणि सुप्रीम कोर्टाची नोटीस’, ‘पीएफआयशी संबंध’ अशा गोष्टी सांगत पाडेकर यांना सातत्याने धमकावण्यात आलं. स्वतःला डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियाचा अधिकारी विजयकुमार असल्याचं सांगून आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचा वापर करून या भामट्यांनी फसवणूक केली. यामध्ये पाडेकर यांचे शेअर्स विक्रीस भाग पाडण्यात आले आणि त्यांची रक्कम १४ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ऑनलाईन ट्रान्सफर करायला लावण्यात आली.

पाडेकर यांना त्यांच्या आधारकार्डचा वापर करून बनावट मोबाईल खरेदी, बोगस व्यवहार, आणि देशद्रोहाशी संबंधित गुन्ह्यांचे खोटे आरोप लावण्यात आले. मोबाईलवरून सुप्रीम कोर्टाची नोटीस, मुंबई पोलिस, आरबीआय व सेबीची पत्रे यासारखी बनावट कागदपत्रे व्हॉट्सॲपवर पाठवण्यात आली. त्यानंतर पाडेकर यांच्या खात्यांतील शेअर्स विकून ७.५ कोटी रुपये व पत्नीच्या खात्यातील ३० लाख रुपये भामट्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले.

प्रकरण लक्षात आल्यानंतर पाडेकर यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून, १४ बँक खात्यांमधील व्यवहार तपासले जात आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि खात्यांची माहिती मागवण्यात आली आहे. सायबर फसवणुकीचा हा प्रकार संघटित टोळीचा भाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पाडेकर यांची तीनही मुलं परदेशात असून, त्यांच्याच सल्ल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker