बातम्याहॅलो कोल्हापूर

अणदूर तलावात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू; मुलगी पोलिस झाल्याचा आनंद फार काळ टिकलाच नाही | Gaganbawada News

कोल्हापूर | गगनबावडा तालुक्यातील अणदूर गावात शनिवारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नंदकुमार शंकर पाटील (वय ४९) या शेतकऱ्याचा मृतदेह अणदूर तलावात आढळून आला. गुरुवारी सकाळी ते सावरगौंड परिसरातील शेतात गेले होते, मात्र त्यानंतर परतलेच नाहीत. दोन दिवस शोध घेतल्यानंतर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.

या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पाय घसरून ते तलावात पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी, शेताभोवती पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या सौरऊर्जा कुंपणाच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे विजेचा शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अणदूरचे अशोक ज्ञानू पाटील यांनी गगनबावडा पोलिसांत वर्दी दिली असून, मृतदेहाचे शवविच्छेदन गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.

विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वीच त्यांची मुलगी निलम हिची पोलिस खात्यात नियुक्ती झाली होती. त्यामुळे सारे कुटूंब आनंदात होते. हा कौतुकाचा क्षण त्यांनी अनुभवला खरा, पण त्याचा आनंद फार काळ त्यांच्या आयुष्यात टिकू शकला नाही. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाइक, मित्र आणि ग्रामस्थांनी त्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker