सावर्डे बुद्रुक : अपघातात मुलाचा मृत्यू, धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण | Kolhapur News
A tragic incident took place in Sawarde Budruk (Tel. Kagal) where a father died due to the shock of his son's death in an accident.
सावर्डे बुद्रुक (ता. कागल) : येथून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना (Kolhapur News) समोर आली आहे. अपघातात मुलाचा मृत्यू झाल्याच्या धक्क्याने वडिलांनीही प्राण सोडल्याने गावात शोककळा पसरली आहे.
तानाजी ज्ञानदेव पाटील (वय 49) असे वडिलांचे नाव असून, त्यांचा मुलगा रितेश याचा 15 मे रोजी गडहिंग्लज येथे परीक्षेला जात असताना दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मुलाच्या अपघातानंतर तानाजी पाटील यांची प्रकृती झपाट्याने ढासळू लागली होती.
शनिवारी सकाळी त्यांना कागल येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी रितेशचे रक्षाविसर्जन होणार होते. परंतु उपचारानंतर घरी परतल्यानंतर तानाजी पाटील यांना चक्कर आली. त्यानंतर पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले असताना त्यांनी उपचारापूर्वीच अखेरचा श्वास घेतला.
तानाजी पाटील हे कोल्हापूर शहरात एका खासगी संस्थेत नोकरी करत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. एका पाठोपाठ बापलेकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

