शेती

कोल्हापूर: खताचे लिंकिंग केल्यास कठोर कारवाई; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा इशारा | Fertilizer linking

कोल्हापूर | शेतकरी हिताला प्राधान्य देत, खत उत्पादक कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत खतांचे लिंकिंग (Fertilizer linking) होणार नाही याची खात्री करावी, अन्यथा कठोर कारवाईला करू, असा स्पष्ट इशारा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला. शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत कृषी विभागाचे अधिकारी, खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि निविष्ठा विक्रेत्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हा इशारा दिला आहे.

खतांचा मुबलक पुरवठा आणि गुणवत्तेवर भर
“जिल्ह्यातील सर्व दुर्गम भागांपर्यंत गुणवत्तापूर्ण आणि पुरेसा खत पुरवठा सुनिश्चित करावा,” असे निर्देश देताना आबिटकर यांनी लिंकिंगच्या प्रथेला आळा घालण्याचे आदेश दिले. जिल्ह्यातील निविष्ठा विक्रेत्यांची तपासणी करून दर्जेदार खते, बी-बियाणे, आणि कीटकनाशके विक्रीसाठी उपलब्ध होण्यासाठी खबरदारी घेण्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सद्यस्थिती
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी जिल्ह्यात 46,757 मेट्रिक टन खत साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली. त्यापैकी 16,143 मेट्रिक टन युरिया आहे. पुढील काळातही खतांचा पुरवठा सुरळीत आणि गुणवत्तापूर्ण राहील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

या बैठकीला आत्मा प्रकल्पाच्या संचालक रक्षा शिंदे, स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी प्रणाली चव्हाण, करवीर उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, कृषी विकास अधिकारी सारिका रेपे यांच्यासह कृषी विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker