कोल्हापूरचा झुंजार पत्रकार! त्यांच्या ‘त्या’ एका वाक्यानं माझी पत्रकारितेतली जीवननिष्ठा निश्चित केली – विजय चोरमारे
झुंजार पत्रकार
कोल्हापुरातील जुन्या पिढीतील पत्रकार असलेले विलासराव झुंजारकाका यांचे सध्याचे वय आहे ९९ वर्षे. येत्या वीस फेब्रुवारीला ते वयाचे शतक पूर्ण करतील. सध्या ते सातारा जिल्ह्यातील सोळशी येथे आपल्या मुलीकडे असतात. अनेक महिन्यांपासून त्यांना भेटण्याची इच्छा होती. ते वाईला असतात, अशी माहिती मिळाली होती. दरम्यान मध्यंतरी सहकारी सतीश घाटगे याच्यासोबत पुण्याहून परत येत असताना झुंजारकाका यांच्याकडे जायचे ठरले. त्यांचे जावई श्री. इंद्रसेन यादव यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक सतीशनेच मिळवला. आणि पूर्वकल्पना देऊन त्यांच्याकडे गेलो. (ते आमचेही पाहुणेच निघाले.)
पुण्याहून येताना खंबाटकी घाट उतरल्यानंतर थोडे पुढे आल्यावर डावीकडे आत जो रस्ता जातो, त्या रस्त्याने सोळशीला जाता येते. स्वेटर, कानटोपी घातलेले विलासराव झुंजारकाका कोचवर बसले होते. मधला बराच काळ भेट नसल्यामुळे आणि वयामुळेही असेल, पण त्यांनी ओळखले नाही. पण नाव सांगितल्यावर ओळखले. मोकळेपणानं हसले. कोल्हापूरच्या आठवणी निघाल्या. स्मृती तेवढी तल्लख राहिली नसली तरी बऱ्यापैकी गोष्टी, जुनी माणसं त्यांना आठवत होती.
झुंजारकाका कोल्हापुरात होते, तेव्हा त्यांच्याशी माझे व्यक्तिशः जिव्हाळ्याचे संबंध होते. ऐंशीव्या वर्षीसुद्धा फिल्डवर जाऊन रिपोर्टिंग करायचे. छोट्या छोट्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचे. त्यांच्या या वृत्तीचे मला खूप कौतुक वाटायचे. पत्रकारितेत अनिष्ट गोष्टी फार पूर्वीपासून चालत आल्या होत्या, परंतु झुंझारकाका त्यापासून सुरक्षित अंतरावर राहिले. संतराम पाटील यांच्यापासून गोविंदराव पानसरेंच्यापर्यंत सगळ्या नेत्यांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध.
पत्रकार परिषदेमध्ये कुणालाही निडरपणे भिडायचे. काहीही विचारायचे. कुणाची भीडभाड ठेवायचे नाहीत. राष्ट्रीय पातळीवरची व्यक्ती असली तरी प्रश्न मराठीत विचारायचे. त्यात संकोच बाळगायचे नाहीत. निडरपणा किती असावा?
एकदा भाजपनेते भैरोसिंग शेखावत कोल्हापूर दौ-यावर आले होते. त्यांची पत्रकार परिषद होती. शेखावत यांच्या कुणी संबंधिताने भ्रष्टाचार केला वगैरे काहीतरी चर्चा होती. शेखावत यांच्या मुलानेच भ्रष्टाचार केला इथपर्यंत ती चर्चा आली होती. माहिती अपुरी होती. एका पत्रकाराने त्यांना त्यासंदर्भात विचारले, की आपके सुपुत्र पर भ्रष्टाचार के आरोप लगे है… वगैरे. (प्रत्यक्षात शेखावत यांना मुलगा नाही, त्यांना एक मुलगी आहे.) त्यावर शेखावत म्हणाले की, मुझे कोई सुपुत्र नही है… त्यावर झुंझारकाकांनी विचारलं, मग कुपुत्र तरी आहे की नाही?
शेखावत हसत म्हणाले, कुपुत्रही नाही. शरद पवार आणि माझ्यात साम्य आहे ते म्हणजे त्यांच्याप्रमाणेच मलाही एकच मुलगी आहे.
माझ्या पत्रकारितेचे अगदी प्रारंभीचे दिवस होते. त्या काळात भारतीय जनता पक्ष, भारतीय किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महागाई किंवा तत्सम प्रश्नांवर आंदोलने करायचे. तहसिलदार कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करायचे. दहा-वीस कार्यकर्ते असायचे, पण पोलिसांबरोबर रेटारेटी व्हायची. वृत्तपत्रांना चांगले फोटो मिळायचे.
पत्रकारितेशी संबंधित काही लोक अशा आंदोलनांची खिल्ली उडवायचे. मूठभरच लोक आहेत. फोटोसाठी नाटक करतात वगैरे. त्यात फोटोग्राफर्स आघाडीवर असायचे. माझ्यासारख्या नवख्यांनाही तशा कमेंट करायची सवय लागली होती. अशाच एका आंदोलनावेळी घटनास्थळी झुंझारकाका आणि मी दोघेच रिपोर्टर होतो. त्यावेळी मी अशीच काहीतरी कमेंट केली की आंदोलक कमी आणि पोलिसच जास्त आहेत वगैरे. त्यावर झुंझारकाका म्हणाले, हे लढणारे लोक आहेत. लोकांच्या प्रश्नावर संघर्ष करतात. आपण यांची ताकद वाढवायची काम करायचं…
झुंजारकाकांचं ते वाक्य माझ्या पत्रकारितेच्या आयुष्याला दिशा देणारं ठरलं. त्यांच्या त्या एका वाक्यानं माझी पत्रकारितेतली जीवननिष्ठा निश्चित केली.


