हॅलो कोल्हापूर

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाला गती; 64 एकर जागा प्राधिकरणाच्या नावे | Kolhapur Airport Expansion

कोल्हापूर | कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या 64 एकर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. तसेच ही जमीन विमानतळ प्राधिकरणाच्या नावे वर्ग करण्यात आली आहे. संबंधित जमिनीची नोंद सातबारा उतार्‍यावर प्राधिकरणाच्या नावाने करण्यात आली असून धावपट्टी विस्तारीकरणासोबतच (Kolhapur Airport Expansion) उर्वरित कामे वेगाने हाती घेण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.

भूसंपादनाची प्रक्रिया यशस्वी

विमानतळाच्या विस्तारासाठी लागणाऱ्या 64 एकरपैकी 32 एकर जमीन थेट खरेदीद्वारे, तर 20 एकर जमीन पुढील खरेदी प्रक्रियेतून संपादित करण्यात आली. उर्वरित 12.5 एकर जमीन 2013 च्या भूसंपादन कायद्यानुसार संपादित करून विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीत वर्ग करण्यात आली. यामुळे विस्तारासाठी लागणारी सर्व जमीन आता उपलब्ध झाली आहे.

धावपट्टीचा विस्तार लवकरच सुरू होणार – Kolhapur Airport Expansion

सध्याच्या 1370 मीटर धावपट्टीचे काम पहिल्या टप्प्यात 1900 मीटरपर्यंत वाढवण्यात आले आहे, ज्यामधील 1700 मीटर धावपट्टीचा वापर सुरू आहे. उर्वरित कामे लवकरच हाती घेण्यात येणार असून, पुढील दोन वर्षांत धावपट्टी 2300 मीटरपर्यंत वाढवली जाईल. या विस्तारामुळे मोठ्या विमानांची ये-जा सुलभ होईल आणि प्रवासी वाहतूक क्षमतेत मोठी वाढ होईल.

वैमानिक प्रशिक्षण केंद्राची सुरुवात

राज्यातील विमानतळांच्या विकासाच्या अनुषंगाने मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कोल्हापूर विमानतळ विकासाचा आढावा घेतला. या बैठकीत कोल्हापूरमध्ये वैमानिक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासंदर्भात गती देण्याचे आश्वासन देण्यात आले.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker