लाच प्रकरणी वनपाल अटकेत; लाचलुचपत विभागाची गडहिंग्लजमध्ये कारवाई | Forest Officer Bribery Case
Forest officer caught red-handed taking bribe for tree cutting permission in road widening project.

कोल्हापूर | गडहिंग्लजमधील परिमंडळ वन अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले वनपाल सागर पांडुरंग यादव (वय ४३) यांनी 6 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलूचपत पथकाने त्यांना अटक केली आहे. त्यांनी अर्जावर कार्यवाही करण्यासाठी ही लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.
आजरा तालुक्यातील राज्य हद्द रस्त्याच्या रुंदीकरणासाठी झाडांची तोड करण्यास मंजुरी मिळवण्यासाठी यादव यांनी ६ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती पाच हजारांची लाच स्विकारण्याची तयारी दर्शवल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ अटक केली आहे.
तक्रारदार हे शेतकऱ्यांच्या शेतातील व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांमध्ये बाधित झाडांची टेंडरद्वारे तोड करून विक्रीचा व्यवसाय करतात. अशाच एका प्रकरणात आजरा तालुक्यातील रस्ता क्रमांक ६३ च्या रुंदीकरणासाठी झाडांची तोड करण्याचा लिलाव तक्रारदारांना मिळाला होता. त्यानंतर आवश्यक परवानग्या घेण्यासाठी त्यांनी २८ एप्रिल २०२५ रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय आजरा येथे अर्ज दाखल केला होता.
सदर अर्ज परिमंडळ वन अधिकारी कार्यालय गडहिंग्लज येथे तपासणीसाठी पोहोचल्याची माहिती मिळाल्यावर तक्रारदार २९ एप्रिल रोजी त्या कार्यालयात गेले. यावेळी वनपाल सागर यादव यांनी अर्ज पुढे पाठवण्यासाठी ६ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर कार्यालयात तक्रार दाखल केली.
पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला यांच्या पथकाने सापळा रचून लाचेची पडताळणी केली. तपासणीत सागर यादव यांनी लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला, सहाय्यक फौजदार अजय चव्हाण, हेड कॉन्स्टेबल सुनिल घोसाळकर, नाईक सचिन पाटील, कॉन्स्टेबल संदिप पवार व कृष्णा पाटील, चालक सहाय्यक फौजदार गजानन कुराडे, चालक प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली.


