आंबोली घाटात दरड कोसळली; पुढील तीन-चार दिवस पावसाचे | Landslide in Amboli Ghat
Landslide Near Amboli Waterfall, No Casualties Reported

कोल्हापूर | मागील काही दिवसांपासून वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे आंबोली-गोवा मार्गावर आंबोली धबधब्याजवळ दरड कोसळल्याची घटना (Landslide in Amboli Ghat) घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दरड कोसळल्यामुळे या मार्गावर एक रुग्णवाहिका अडकली होती. यावेळी काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत रस्त्यावर पडलेले मोठमोठे दगड बाजूला केले आणि रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी वाट करून दिली.
दरम्यान, या भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सततच्या पावसामुळे आंबोली धबधबाही पूर्णपणे प्रवाहित झाला असून, परिसरात जुलै-ऑगस्ट महिन्यातील पावसासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसभर रिपरिप सुरू असल्याने हवेत गारठा जाणवतो आहे.
या अवेळी पावसामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिकं अजूनही शिवारात उभी आहेत. या पिकांची काढणी करता न आल्याने नुकसान होत आहे. ऊस पिकासाठी हा पाऊस फायदेशिर असला तरी, उसाच्या लागवडीचे काम आणि पेरणीपूर्व मशागतीही ठप्प झाल्या आहेत.
हवामान विभागाने पुढील तीन-चार दिवस पावसाचा इशारा दिला असून, शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.