संभापूर येथील दोन सख्या भावांचा काही तासांच्या अंतराने मृत्यू, दुर्दैवी घटनेने गावात हळहळ | Kolhapur News
Two brothers aged 4 and 6 die within hours in Sambhapur; village in mourning, cause under investigation

कोल्हापूर (Kolhapur News) | संभापूर (ता. हातकणंगले) येथील पोवार कुटुंबावर आभाळच कोसळल्याची घटना गुरुवार आणि शुक्रवारी घडली. अवघ्या काही तासांच्या अंतराने एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.
मृत्यू पावलेली बालके म्हणजे वरद सागर पोवार (वय ६) व विराज सागर पोवार (वय ४) अशी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या दोन्ही भावंडांना मंगळवारी पोटदुखी व उलट्या होण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर पेठ वडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. काही प्रमाणात त्यांना आराम मिळाल्यानंतर घरी पाठवण्यात आले.
मात्र गुरुवारी पुन्हा तब्येत बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी लहान भाऊ, विराजला, गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले. त्याच्या मृतदेहावर पारगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
तेवढ्यात मोठा भाऊ वरद याची प्रकृतीही झपाट्याने खालावली. त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही त्याची झुंज अपयशी ठरली आणि शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
ही बातमी समजताच पोवार कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. एकाच घरातील दोन गोंडस मुलांचे एकामागोमाग निधन झाल्याने सर्वच हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांची आई, सौ. पूजा सागर पोवार याही आजारी असून त्यांच्यावर सध्या कोल्हापुरात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या दोन्ही बालकांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अंतिम शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच याबाबतची निश्चित माहिती मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब आणि ग्रामस्थ या अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. हसत-खेळत वाढणारी दोन चिमुरडी मुले काही तासांच्या अंतराने मृत्युमुखी पडल्याने ही घटना सर्वांच्याच मनाला चटका लावणारी ठरली आहे.