Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
News

ज्यांनी ‘गोकुळ’ उभं केलं, त्यांचाच मुलगा होणार गोकुळचा नवा कारभारी! Gokul Milk Politics

Shashikant Patil-Chuyekar likely to be elected unopposed as Gokul Dairy's new president after Arun Dongle resigns amid political pressure.

कोल्हापूर | गेल्या काही दिवसांपासून गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावर सुरू असलेला सत्तासंघर्ष (Gokul Milk Politics) अखेर एका सर्वमान्य नावावर येऊन थांबण्याची चिन्हं आहेत. संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव आता अध्यक्षपदासाठी पुढे आले असून, त्यांना बहुमताने पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

मंगळवारी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी कार्यकारी अध्यक्ष योगेश गोडबोले यांच्याकडे आपला राजीनामा सादर केल्याने अध्यक्षपद रिक्त झाले आहे. त्यानंतर गुरुवारी नवीन अध्यक्ष निवडीसाठी बैठक बोलावण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड निश्चित मानली जात आहे.

शशिकांत पाटील हे आमदार सतेज पाटील यांचे समर्थक मानले जात असले तरी, संस्थापकांचे पुत्र या नात्याने त्यांना संघात व्यापक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, याआधी त्यांची आई जयश्री पाटील-चुयेकर संचालक होत्या, तर आता शशिकांत पाटील पहिल्यांदाच संचालक मंडळात आले आहेत. मंत्री हसन मुश्रीफ, आमदार डॉ. विनय कोरे आणि सतेज पाटील यांच्या बैठकीनंतर शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सुरुवातीला राजीनामा नाकारत “महायुतीचा अध्यक्ष पाहिजे” असा दावा केला होता. मात्र, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी फटकारल्याने डोंगळे यांनी माघार घेत राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.

गोकुळमध्ये अध्यक्षपद हे केवळ प्रशासकीय नसून, मोठ्या राजकीय वजनाचे मानले जाते. त्यामुळे कोणताही गट थेट विरोध करायला धजावत नाही. आमदार चंद्रदीप नरके आणि संचालक अमरसिंह पाटील हे शशिकांत पाटील यांचे नातेवाईक आहेत, त्यामुळे त्यांच्या गटाकडून देखील शशिकांत पाटील यांना विरोध होणार नसल्याचे स्पष्ट आहे.

याआधी बाबासाहेब चौगले यांचे नाव चर्चेत होते. वरिष्ठाच्या विरोधामुळे चौगलेंचे नाव मागे पडल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत, सर्व गटांशी सलोखा असणारे आणि संस्थापक कुटुंबातील चेहरा यामुळे शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड निश्चित मानली जात आहे. गुरुवारी होणाऱ्या बैठकीनंतर या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे संकेत आहेत.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा