Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी माझ्या विरोधातील उमेदवाराला आर्थिक मदत केली; राजेश क्षीरसागर यांचा गंभीर आरोप
कोल्हापूर | महायुतीतील काही नेते काँग्रेससोबत संगनमत करत असून, त्यांनी विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधी उमेदवाराला आर्थिक मदत केल्याचा आरोप राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता केला. क्षीरसागर यांनी केलेल्या आरोपांमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.
शक्तीपीठ महामार्गाला विरोध नको
महायुतीच्या नेत्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात जाऊ नये, असे सांगत आमदार क्षीरसागर यांनी महायुतींच्याच नेत्यांना महायुतीच्या प्रकल्पाला विरोध करता येणार नाही असे सांगितले. महायुतीचे जे नेते शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत असतील त्यांनी तो करू नये. महायुतीच्या निर्णयाच्या पाठीशी त्यांना राहावे लागेल. महाराष्ट्राच्या विकासाचा हा माईलस्टोन ठरणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
हद्दवाढ आणि महामार्गाबाबत राजेश क्षीरसागर यांची भूमिका
हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे असे सांगत, आमदार क्षीरसागर यांनी कोल्हापूरची हद्दवाढ गरजेची असून ती लवकरच होईल, असे सांगितले. तसेच शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा पराभवावर भाष्य
महायुतीचा लोकसभा निवडणुकीतील पराभव हा शक्तीपीठ महामार्गामुळे नव्हे, तर विरोधकांनी खोटे नॅरेटिव्ह तयार केल्यामुळे झाल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. “महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या व्यक्तीमत्वाच्या प्रभावामुळे त्यांचा विजय झाला, तो महाविकास आघाडीचा विजय नाही” असेही त्यांनी नमूद केले.
विरोधकांचा विकासकामांमध्ये अडथळा
विरोधक आता विकासकामांमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप करत आमदार क्षीरसागर म्हणाले, “शेतकरी महामार्गाला पाठिंबा देत आहेत, मग काही नेत्यांना विरोध करण्याची गरज काय?” तसेच “मी मित्रा संस्थेवर काम करतो, त्यामुळे प्रकल्प पुढे नेण्याची जबाबदारी माझी आहे,” वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे फक्त त्यांच्या खात्याची जबाबदारी आहे. ती मर्यादित असल्याचा टोला यावेळी आमदार क्षीरसागर यांनी लगावला.
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार क्षीरसागर यांनी केलेल्या आरोपांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं असून याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ काय उत्तर देतात हे पहावं लागणार आहे.