बातम्याहॅलो कोल्हापूर

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; घरात घुसून खात्मा केला जाईल… | Indrajit Sawant

कोल्हापूर | इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांना आज (शुक्रवार) पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. केशव वैद्य या नावाने ही धमकी देण्यात आली असून, सावंत यांच्या घरात घुसून त्यांचा खात्मा केला जाईल, असा उल्लेख या धमकीत आहे. या व्यक्तीने Youtube चॅनेलच्या कमेंटमधून ही धमकी दिली आहे.

चार दिवसांपूर्वी नागपूरच्या प्रशांत कोरटकरनेही इंद्रजीत सावंत यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणामुळे महाराष्ट्रभर गदारोळ माजला आहे. पोलिस यंत्रणा कोरटकरच्या शोधात असताना, आज पुन्हा सावंत यांना धमकी आल्याने तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर इंद्रजीत सावंत यांनी वकिलांची भेट घेतली असून, तक्रार दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

प्रशांत कोरटकर फरार का?

इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर “तो मी नव्हेच” असा दावा करणारा प्रशांत कोरटकर फरार का झाला, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. कोल्हापूर पोलिसांनी नागपूरमधील त्याच्या घराची पाहणी केली, मात्र तो तेथे आढळला नाही. तो मध्य प्रदेशातील बालाघाट येथे फरार झाल्याचे बोलले जात असून, पोलिसांचे एक पथक त्याच्या मागावर आहे. दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी कोरटकर प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली आहे.

इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण – घटनाक्रम:

  • 24 फेब्रुवारी – रात्री प्रशांत कोरटकरच्या नावाने इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आला.
  • 25 फेब्रुवारी – सकाळी कोरटकरच्या नावाने सोशल मीडियावर धमकीचा व्हिडिओ पोस्ट झाला.
  • 25 फेब्रुवारी – व्हिडिओ व्हायरल होताच कोरटकरने मीडिया समोर तो आवाज आपला नसल्याचे सांगितले.
  • 25 फेब्रुवारी – वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून त्याने स्वतःलाही धमक्या येत असल्याचा दावा केला.
  • 25 फेब्रुवारी – नागपूर पोलिसांनी खबरदारी म्हणून त्याच्या घरी बंदोबस्त वाढवला.
  • 25 फेब्रुवारी – तो मुलीला परीक्षा केंद्रावर सोडून घरी परतला नाही आणि त्यानंतर फोनही बंद केला.
  • 26 फेब्रुवारी – तो शिवनी, बालाघाटमार्गे मध्य प्रदेशात गेल्याचा दावा.
  • तत्पूर्वी – देवदर्शन केल्याची माहिती समोर आली.
  • सद्यस्थिती – तो सतत प्रवास करत असून पोलिसांना चकवा देत आहे. नागपूर व कोल्हापूर पोलिसांचे तीन पथक त्याच्या शोधात आहेत.

प्रशांत कोरटकर पोलिसांना सहकार्य का करत नाही?

जर तो आवाज प्रशांत कोरटकरचा नसल्याचा त्याचा दावा खरा असेल, तर तो फरार का आहे? त्याने पोलिसांना आवाजाचे नमुने देऊन तपासात सहकार्य का केले नाही? तसेच तो अटकपूर्व जामिनासाठी धावपळ का करत आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिस तपास वेगाने सुरू आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker