Swargate Rape case : मंत्री योगेश कदम व संजय सावकारेंना असंवेदनशीलपणा भोवला; CM फडणवीस अन् अजितदादांनी झापले
मुंबई | पुण्यातील स्वारगेट प्रकरणावर (Swargate Rape case) मंत्री योगेश कदम आणि मंत्री संजय सावकारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा गदारोळ उडाला. विरोधकांनीही या दोन्ही मंत्र्यांवर टीका केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना मंत्री आणि आमदारांनी अशा संवेदनशील प्रकरणांवर जबाबदारीने बोलले पाहिजे, असे सांगत दोन्ही मंत्र्यांचे कान टोचले.
मंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना, “या घटनेत तरुणीने कोणताही प्रतिकार केला नाही, कोणताही वादविवाद झाला नाही, त्यामुळे घटना शांततेत घडली,” असे वक्तव्य केले होते. तर मंत्री संजय सावकारे यांनी, “अशा घटना पुण्यातच नाही, तर देशभरात घडतात,” असे म्हटले होते.
या वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, योगेश कदम यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाला असावा. त्यांनी गर्दीच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिक्रिया दिली असावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी; ‘वंचित’च्या प्रकाश आंबेडकरांची मागणी
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील घटना यावर राज्य गृहमंत्री योगेश कदम यांचे स्टेटमेंट असंवेदनशील आहे. त्यातून त्यांची मानसिकता दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदमसारख्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवावं असे म्हणत त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे”, अशी मागणी केली आहे.
चोहोबाजूनी घेरल्यानंतर योगेश कदम यांची तातडीची पत्रकार परिषद, काय म्हणाले?
आमचे सरकार लाडक्या बहिणींचे सरकार आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आमचे सरकार संवेदनशील आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणाबाबत मी प्रत्येक बैठकीत कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. गुरुवारी मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे योगेश कदम यांनी तातडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, स्वारगेटला गेल्यावर मला लक्षात आले की त्या ठिकाणी प्रचंड रहदारी आहे. नेहमी वर्दळ असणारी ती जागा आहे. त्या ठिकाणी आमच्या बहिणीवर अत्याचार होत असताना कोणी त्या बहिणीला वाचवण्यासाठी का गेले नाही? हा प्रश्न मला पडला. तो प्रश्न मी पोलिसांना विचारला. त्यावेळी पोलिसांनी दिलेले उत्तर मी माध्यमांना दिले.


