बातम्या

स्वारगेट बलात्कार प्रकरणी गृहराज्य मंत्र्यांकडून पीडीतेसह एसटी महामंडळाला दोष; पोलिसांना मात्र क्लीन चीट | Pune Rape Case

पुणे | स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या धक्कादायक बलात्कार प्रकरणात गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी पोलिसांना क्लीनचिट दिली असून, एसटी महामंडळ आणि त्यांच्या सुरक्षा यंत्रणेला जबाबदार ठरवले आहे. तसेच, पीडीत तरूणीने कोणताही प्रतिकार न केल्याने घटना घडल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

गृहराज्य मंत्र्यांची घटनास्थळी पाहणी

या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून, पुण्यात तीव्र निदर्शने होत आहेत. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि पोलिसांसोबत चर्चा करत घटनेचा आढावा घेतला.

पोलिसांना क्लीनचिट

मंत्री कदम यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, पोलिसांकडून कुठेही दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा झालेला नाही. “पोलिसांनी वेळोवेळी गस्त घातली असून, त्यांची उपस्थिती सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे,” असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी रात्री 12 ते 6 वाजेपर्यंत दोन वेळा गस्त घातली होती, असा त्यांनी दावा केला.

एसटी महामंडळ आणि सुरक्षा यंत्रणेला दोष

मंत्री कदम यांनी सांगितले की, स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षा यंत्रणा खाजगी एजन्सीच्या ताब्यात होती आणि तिची जबाबदारी एसटी महामंडळाची आहे. “डेपो मॅनेजर आणि एसटी महामंडळाने सुरक्षा यंत्रणेची कार्यक्षमता तपासणे आवश्यक होते. जर सुरक्षा व्यवस्थित केली गेली असती, तर हा प्रकार घडला नसता,” असे ते म्हणाले.

पीडीत महिलेकडून प्रतिकार नाही; प्रवाशांचाही निष्क्रिय प्रतिसाद

मंत्री कदम यांनी सांगितले की, घटनास्थळी 10 ते 15 प्रवाशी उपस्थित होते, मात्र महिलेकडून प्रतिकार न झाल्यामुळे त्यांनी हस्तक्षेप केला नाही. “जर प्रतिकार झाला असता, तर प्रवाशांनी त्वरित हस्तक्षेप केला असता, परंतु तसे झाले नाही,” असे त्यांनी नमूद केले.

कायदेशीर कारवाई आणि सुरक्षेची गरज

गृहराज्य मंत्री कदम यांनी एसटी महामंडळ आणि सुरक्षा एजन्सीवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. राज्यातील सुरक्षेच्या दृष्टीने ठोस आणि कठोर उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Back to top button