पुणे: दत्ता गाडे मध्यरात्री पाणी मागण्यासाठी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला | Pune Rape Case
पुणे | स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून फरार झालेला आरोपी दत्तात्रय गाडे अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तो शिरूर तालुक्यातील आपल्या मूळ गावी, गुनाट येथील उसाच्या फडांमध्ये लपून बसला होता. मात्र, भूक आणि तहान सहन न झाल्याने तो बाहेर पडला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी शोध मोहीम सुरू ठेवली होती. मध्यरात्री गाडे गावातील एका घरात पाण्यासाठी गेला असता, त्या घरातील लोकांनी त्याला पोलिसांना शरण जाण्याचा सल्ला दिला. त्यावेळी त्यानेही शरण जाण्याची तयारी दर्शवली, मात्र लगेचच तेथून निघून गेला. अखेर, भुकेने व्याकुळ झालेल्या गाडेने बाहेर येण्याचा निर्णय घेतला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.
स्थानिक ग्रामस्थ, युवक आणि पोलिसांनी मिळून कठोर शोध मोहीम राबवली. गाडेने उसाच्या फडात लपण्यासाठी वापरलेले कपडेही पोलिसांना आढळून आले होते. त्याला पळण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहिला नव्हता. त्याच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनीही अनाउन्समेंट करून त्याला पोलिसांसमोर शरण येण्याचे आवाहन केले होते.
गुनाट गावच्या पोलीस पाटलांनीही त्याला शरण येण्यास सांगितले होते. अखेर, दोन दिवस उपाशी असलेल्या गाडेला पाण्याची आणि अन्नाची गरज भासल्याने तो बाहेर आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे आणि पोलिसांच्या सततच्या प्रयत्नांमुळे या शोध मोहिमेला यश मिळाले आहे.