बातम्याहॅलो कोल्हापूर

HSRP नंबर प्लेट बाबत महत्वाची बातमी: 15 ऑगस्टची मुदत संपली, पुढे काय?

कोल्हापूर | दिनांक १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दिनांक १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. ही मुदत आज संपत आहे. परंतु जुन्या वाहनांना HSRP बसविण्याचे कामकाज बाकी असल्याने परिवहन आयुक्त कार्यालयाच्या परिपत्रकान्वये सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसविण्यासाठी दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत नव्याने अंतिम मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

दिनांक १ डिसेंबर २०२५ पासून उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) न बसविणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाव्दारे कारवाई करण्यात येणार आहे. तथापि, दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत HSRP बसविण्यासाठी पुढील अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर या कार्यालयात वाहन मालकीचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, विमा अपडेट इत्यादी वाहन संदर्भातील कामे वाहनांना HSRP बसविल्याचे प्रमाणिकरण केल्यानंतरच करण्यात येतील, याबाबतची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी. 

एचएसआरपी (HSRP) म्हणजे काय?

एचएसआरपी किंवा हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (High Security Registration Plate) ही अ‍ॅल्युमिनियमपासून बनवलेली नंबर प्लेट आहे. या नंबर प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात एक यूनिक लेसर ब्रँडेड १० अंकी पिन दिलेला असतो. ही पाटी ॲल्युमिनियमपासून बनवलेली असून १.१ मिमी एवढा तिचा आकार असतो. तसेच त्या नंबर प्लेटवर एक होलोग्राम जोडण्यात आला असून तो क्रोमियम आधारित आहे. स्टिकरप्रमाणे दिसणाऱ्या होलोग्राममध्ये वाहनांचा सर्व तपशील ऑनलाइन नोंद होतो. सर्वात महत्वाचं म्हणजे ही नंबर प्लेट बनावट पद्धतीने बनवता येत नाही. तसेच भारत सरकारने एप्रिल २०१९ नंतर विकल्या गेलेल्या प्रत्येक वाहनावर एचएसआरपी वापरणे अनिवार्य केलं आहे. तसेच रस्ते आणि वाहनांच्या संबंधित गुन्ह्यांमध्ये घट करण्याच्या दिशेने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, ३१ मार्चच्या आधी गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसवून घ्यावी लागणार आहेत.

एचएसआरपी नंबर प्लेट कशी बसवावी?

एचएसआरपी नंबर प्लेट मिळवण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन प्रोसेस करावी लागते. तसेच पोर्टलवर आवश्यक ती माहिती सबमिट करावी लागते. वाहन आणि फोनचे तपशील वाहन पोर्टलवरील तपशीलाशी जुळले पाहिजेत याची नोंद घ्यावी लागते.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी काय प्रोसेस करावी?

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट ओपन करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तेथील डिटेल्स अर्थात वाहनाचा क्रमांक, वाहनाच्या चेसीचा क्रमांक, पत्ता वैगेरे अशी माहिती भरावी लागेल. तसेच तुम्ही तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला त्याची पावती देखील डाऊनलोड करता येईल. ही प्रोसेस केल्यानंतर पुढील काही दिवसांत तुमची हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मिळेल.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर काय नमूद असते?

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या दर्शनी भागावर डाव्या कोपऱ्यात ‘IND’ ही अक्षरे नमूद असून त्याचा आकार वाहन क्रमांकाच्या एक चतुर्थांश ठरविण्यात आला आहे. २० मिमी आकाराचे क्रोमियम-आधारित अशोक चक्र आहे. ते ‘हॉट स्टॅम्पिंग’द्वारे छापण्यात आले आहे. पाटीसाठी विशेष दहा आकड्यांचा वेगळा क्रमांक देण्यात आला आहे. पाटीवरील मजकूर जास्त होऊ नये म्हणून हे अंक ‘रिफ्लेक्टिव्ह शीट’वर ‘लेसर ब्रँड’ केले आहेत. ते पाटीच्या खाली डाव्या बाजूला प्रकाशित करण्यात आले असून या अंकांसाठी ५ मिमी जागा निश्चित करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वाहन खरेदी करताना ‘आरटीओ’ नोंदणी प्राधिकरण, वाहनधारकाचे नाव, मोबाइल क्रमांक, इंजिन क्रमांक, वाहन क्रमांक, नाव, पत्ता आदी माहिती संगणकीकृत करण्यात आली आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker