कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाची हजेरी; तिघांना लागण, खासगी रुग्णालयात उपचार सुरू | Kolhapur Corona Update 2025
Covid cases resurface in Kolhapur; health officials assure situation is under control across India.
कोल्हापूर | कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात तीन जणांना कोरोनाची लागण (Kolhapur Corona Update 2025) झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यापैकी एकजण बरा होऊन घरी परतला असून, उर्वरित दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Kolhapur Covid-19 Update
कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील 83 वर्षीय वृद्ध रुग्णाचा कोरोना अहवाल 12 मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. मात्र, त्यांच्या प्रकृतीवर घरीच उपचार करण्यात आले. उपचाराला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत.
दुसऱ्या दोन रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्यातील 40 वर्षीय महिला आणि शाहूवाडी तालुक्यातील आणखी एक 40 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. दोघींचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून सध्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी या दोघींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं सांगितलं आहे.
देशातील कोरोना स्थिती: सक्रिय रुग्णांची संख्या 257
देशभरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 257 वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक 95 रुग्ण असून, त्यानंतर तामिळनाडूमध्ये 66, महाराष्ट्रात 56 आणि कर्नाटकमध्ये 13 रुग्ण उपचाराखाली आहेत.
मुंबईतील केईएम रुग्णालयात सोमवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे की या रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे नाही, तर त्यांच्या दीर्घकालीन आजारांमुळे झाला आहे. त्यापैकी एका रुग्णाला तोंडाचा कर्करोग होता, तर दुसऱ्याला मूत्रपिंडाशी संबंधित गंभीर आजार होता.
आशियात कोरोनाचा नवा प्रकार सक्रिय
सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडसारख्या आशियाई देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. सिंगापूरमध्ये 1 ते 19 मे दरम्यान 3 हजार नवीन रुग्ण नोंदले गेले असून एप्रिलच्या अखेरीस ही संख्या 11,100 इतकी होती. येथे रुग्णसंख्येत 28 टक्के वाढ झाली आहे. हाँगकाँगमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत 81 रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चीन आणि थायलंडमध्येही प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आले आहेत, तरीही नेमक्या रुग्णसंख्येची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
भारतात स्थिती नियंत्रणात, तज्ज्ञांचा सतर्क राहण्याचा सल्ला
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात 1 जानेवारी ते 19 मे 2025 या कालावधीत केवळ 157 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामुळे सध्या कोणतीही मोठी लाट नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं मंत्रालयाने सांगितलं आहे. विशेषतः मुंबईत सौम्य लक्षणे असलेले रुग्ण अधिक आढळत आहेत आणि ते बहुधा तरुण वयोगटातील आहेत. मात्र, शेजारील देशांमध्ये वाढती प्रकरणे पाहता भारतीय आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांनी सतर्क राहण्याचं आणि गरज असल्यास लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं आहे.


