बातम्याहॅलो कोल्हापूर

गगनबावडा तालुक्यात बेसुमार वृक्षतोड; वृक्षसंपदा धोक्यात | Illegal tree cutting in Gaganbawda

Illegal tree cutting in Gaganbawda threatens rich forest cover and medicinal plants; environmentalists outraged.

गगनबावडा (प्रतिनिधी) | हिरवाईने नटलेला, औषधी वनस्पतींनी समृद्ध असलेला गगनबावडा तालुका सध्या बेसुमार वृक्षतोडीच्या विळख्यात सापडला आहे. या अमानुष वृक्ष तोडीमुळे निसर्गसंपदा धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे, या भागातील काही गावे ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून जाहीर असूनही, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे आणि आर्थिक देवघेवीमुळे परवानगीशिवाय (Illegal tree cutting in Gaganbawda) मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तालुक्यातील निवडे परिमंडळात वनपाल आणि वनरक्षक यांच्या आशीर्वादानेच ही वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. यामुळे जंगलातील अनेक औषधी वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर असून संपूर्ण परिसराचं पर्यावरणीय संतुलन ढासळू लागलं आहे.

जंगल उघडं बोडकं, प्राणी मानवी वस्तीत

गगनबावडा तालुका डोंगराळ व दुर्गम असल्यामुळे येथे घनदाट जंगल आहे. या जंगलात अनेक दुर्मीळ औषधी वनस्पती, जुनी झाडं व वन्यजीव आढळतात. मात्र वृक्षतोडीमुळे आता हा परिसर उघडा बोडका झाला असून जंगलातील गवे प्राणी आता अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. या वन्यप्राण्यांचा त्रास आता नागरिकांना भेडसावत आहे.

लाकूड व्यापार्‍यांचा धिंगाणा, जुनी झाडं नष्ट

या परिसरात अनेक लाकूड व्यापारी सक्रिय असून त्यांनी पैशाच्या हव्यासापोटी जुन्या व मोठ्या झाडांची कत्तल सुरू केली आहे. लाकूड पासच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक देवघेवी होत असल्याचे आरोप होत आहेत. शेकडो ठिकाणी तोडलेली झाडं रस्त्यालगत पडलेली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

धोक्यात आलेली वृक्ष संपत्ती

औषधी गुणधर्म असलेल्या हिरडा, जांभूळ, निलगिरी, पिंपळ, उंबर, आंबा, फणस यांसारख्या झाडांची सर्रास तोड सुरू आहे. त्यामुळे या झाडांचा वंशच संकटात आला आहे. झाडांच्या मुळावर उठलेले व्यापारी आलिशान गाड्यांतून फिरताना दिसत असून कायदा व पर्यावरणाची थट्टा उडवत आहेत.

पर्यावरणप्रेमींचा इशारा

“सध्या तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ गेले आहे. अशा वेळी जर झाडांचीच कत्तल केली जात असेल तर मानवी जीवनच धोक्यात येईल. एका झाडाला मोठं होण्यासाठी १५ ते २० वर्षे लागतात. त्यामुळे झाडं लावणं आणि जगवणं ही सर्वांची जबाबदारी आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,” असे मत पर्यावरणप्रेमी अमर जत्राटे (बालिंगे) यांनी व्यक्त केले.

गगनबावड्यात सुरू असलेली ही बेसुमार वृक्षतोड जर वेळीच थांबवली गेली नाही, तर हा निसर्गसंपन्न परिसर कायमचा उजाड होईल, अशी भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

Back to top button