कोल्हापूर: वैष्णवीच्या खुनाचा सूत्रधार देवठाणेतील मठाचा प्रमुख बाळकृष्ण महाराज..?, गुन्हा दाखल होताच गायब! Kolhapur Crime News
कोल्हापूर | शनिवार पेठेतील वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (वय २४) हिच्या खुनामागे देवठाणे (ता. पन्हाळा) येथील मठाचा प्रमुख बाळकृष्ण महाराज असल्याची चर्चा (Kolhapur Crime News) परिसरात सुरू आहे. मृत वैष्णवीची आई शुभांगी आणि अटकेतील दोन सेवकांनीही पोलिसांची दिशाभूल केल्याने संशयाची सुई महाराजाकडे वळली आहे. त्याच्या अटकेनंतर आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देवठाणे येथे असलेल्या श्री नृसिंह समर्थ ज्ञान मंदिर मठाचा कारभार बाळकृष्ण महाराज पाहत आहे. याच महाराजाच्या आणि मठाच्या सेवेत वैष्णवी पोवार कार्यरत होती. गेल्या वर्षभरापासून ती महाराजासोबत वावरत होती. महाराजाची खासगी मदतनिस अशीच तिची भूमिका होती. काही दिवसांपूर्वी घरी आलेली वैष्णवी रंगपंचमीनंतर पुन्हा पुणे येथे महाराजांकडे गेली होती.
महाराजानेच तिच्या आईला आणि मठातील सेवेकरी संतोष आडसुळे याला पुण्याला बोलवून घेतले होते. तिथेच त्यांनी वैष्णवीला मारहाण करण्याचा सल्ला सेवेकऱ्यांना दिला होता. त्याच्या सांगण्यावरूनच सेवेकऱ्यांनी देवठाणे येथील मठात नेऊन वैष्णवीला बेदम मारहाण केली होती.
मारहाणीपर्यंत सतत सेवेकऱ्यांच्या संपर्कात असलेला महाराज त्यानंतर मात्र गायब झाला आहे. वैष्णवीचा मोबाइलही अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. तो मोबाइल सेवेकऱ्यांनी गायब केला असावा किंवा महाराजाकडेच असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
वैष्णवीची आई आणि भाऊ यांच्यासमोर तिचे हातपाय बांधून तिला मारहाण झाली होती. मात्र, त्यांच्या माहितीत विसंगती येत आहे. अटकेतील सर्वच सेवेकरी महाराजाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला असून, संशयित बाळकृष्ण महाराजाच्या अटकेनंतर वैष्णवीच्या खुनाचे खरे कारण समोर येणार आहे.
देवठाणेत कुजबुज
१७०० ते १८०० लोकवस्तीच्या पन्हाळा तालुक्यातील देवठाणे गावात महाराजाबद्दल उघडपणे बोलण्याचे धाडस कोणी दाखवत नाही. मात्र, त्याच्या वर्तनाबद्दल दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा आहेत. मठाच्या भक्त मंडळातील काही सेवेकरी नियमित महाराजांच्या संपर्कात असतात. त्यांच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पोलिसांची दिशाभूल केली
वैष्णवीची आई आणि सेवेकरी सुरुवातीपासूनच तपासात पोलिसांची दिशाभूल करीत आहेत. वैष्णवी आधीच पुण्यात महाराजासोबत होती, तरीही तिला कोल्हापुरातून घेऊन गेल्याचे त्यांनी सुरुवातीला पोलिसांना सांगितले होते. तिच्या मोबाइलबद्दलही चुकीची माहिती दिली. अजूनही त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा वैष्णवीचा आग्रह?
प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा आग्रह धरणाऱ्या वैष्णवीला तिच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी मारहाण करण्याचा सल्ला देवठाणे (ता. पन्हाळा) येथील मठातील महाराजाने दिला होता, अशी माहिती मृत तरुणी वैष्णवी पोवार हिच्या आईच्या चौकशीतून समोर आली होती. त्यामुळे या गुन्ह्यातील पाचवा आरोपी निष्पन्न झाला असून, त्याच्या अटकेसाठी लक्ष्मीपुरी पोलिस पुण्यात पोहोचले आहेत. दरम्यान, मारहाणीत सहभागी असलेला मठातील सेवक प्रशांत ऊर्फ नऱ्या संदीप शेवरे (२६, रा. देवठाणे) याला पोलिसांनी अटक केली. मारहाण झालेल्या मठाचा कारभारही संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
शनिवार पेठेतील वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (२४) हिने पुण्यातील मित्रासोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा आग्रह धरला होता. मात्र, तिचा निर्णय आईला मान्य नव्हता. त्यामुळे देवठाणे येथील महाराजांकडून तिचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न आईकडून सुरू होता. संबंधित महाराज पुण्यातील एका भक्ताकडे राहण्यासाठी गेल्याने बुधवारी (दि. ३) शुभांगी पोवार ही मुलगी वैष्णवी, मुलगा श्रीधर आणि मानलेला भाऊ संतोष आडसुळे यांना घेऊन पुण्याला गेली. तिथे महाराजांनी वैष्णवीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. मारहाण करून तिला तिच्या निर्णयापासून परावृत्त करा, असा सल्ला महाराजाने तिच्या आईला दिला. मारहाणीसाठी तिला देवठाणे येथील मठात घेऊन जाण्यासही त्याने सांगितल्याचे बोलले जात आहे.

