Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
बातम्याहॅलो कोल्हापूर

कोल्हापुरात बनावट नोटांची छपाई; थेट हाँगकाँगहून मागवले साहित्य | Kolhapur Fake Currency News

Hello Kolhapur | पाचशे, दोनशे आणि पन्नास रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा छापणाऱ्या कळंबा (ता. करवीर) येथील दत्तोबा शिंदेनगरमधील अड्ड्यावर मुंबई येथील डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय), गोवा रिजनल युनिट व करवीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकत पर्दाफाश केला. गुरुवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा आणि त्याच्या छपाईसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुख्य संशयित सिद्धेश श्रीकांत घाटगे (वय 26, रा. दत्तोबा शिंदेनगर, कळंबा) याला अटक करण्यात आली आहे.

संयुक्त कारवाईने उडाली खळबळ – Kolhapur Fake Currency News

या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नवी दिल्ली, मुंबई, गोवा आणि स्थानिक करवीर पोलिसांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात आली. बनावट नोटा प्रकरणाची माहिती समजताच दत्तोबा शिंदेनगर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. छाप्यादरम्यान महत्त्वाचे पुरावे हाती लागताच संशयिताविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयिताला 25 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सिद्धेश घाटगे याला न्यायालयाने 25 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी संशयिताच्या खोलीतून मोठ्या प्रमाणावर पुरावे हस्तगत केले आहेत. यामध्ये ए-4 साईजचे कागद, 50, 200 आणि 500 रुपयांच्या छापलेल्या बनावट नोटा, हाय सिक्युरिटी थ्रेड आणि आरबीआय तसेच भारत सरकारचा लोगो असलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली. तसेच हाँगकाँगहून डीटीडीसी कुरियरद्वारे मागविण्यात आलेल्या सामग्रीसह त्याचा ट्रॅकिंग नंबरही सापडला आहे.

बनावट नोटा छपाईसाठी बाहेरील देशातून मागवले साहित्य

संशयिताने स्वतःच्या फायद्यासाठी भारतीय चलनी नोटांसारख्या हुबेहूब बनावट नोटा छापण्याची व्यवस्था केली होती. यासाठी त्याने बाहेरील देशांतून छपाईसाठी लागणारे साहित्य मागवले होते. महसुली नुकसान आणि भारत सरकारची फसवणूक करण्याच्या हेतूने संशयिताने हे साहित्य मागवल्याचा पोलिसांचा संशय आहे. तसेच डीटीडीसी कुरियरचा गैरवापर केल्याचा ठपकाही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

कर्नाटक, गोवा व दिल्ली कनेक्शन उघड होण्याची शक्यता

संशयिताकडून सखोल चौकशी सुरू असून या प्रकरणाचे धागेदोरे कर्नाटक, गोवा आणि दिल्लीपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker