तांदळापासून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती, कोल्हापूर जिल्ह्यातील कलाकाराची अनोखी कला | Chhatrapati Shivaji Maharaj
विशाळगड | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यावरील श्रद्धा प्रत्येकाच्या मनात दाटून आलेली असते. कलाकारही यामध्ये आघाडीवर असतात. अशाच एका कलाकाराने आपल्या अनोख्या कलेच्या माध्यमातून शिवरायांना आदरांजली अर्पण केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील येळाणे येथील कलाकार व शिक्षक केवल किरण यादव यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अवघ्या दोन तासांत तांदळाच्या दाण्यांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिकृती साकारली आहे.
ही कलाकृती ३ बाय ३ फूट आकाराची असून, तांदळाला विविध रंगछटांसाठी अक्रिलिक रंगांचा वापर करण्यात आला आहे. लहानपणापासून चित्रकलेची आवड असलेल्या केवल यादव यांनी आतापर्यंत ४५० हून अधिक चित्रे काढली आहेत. मात्र, यंदा काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने त्यांनी तांदळाच्या दाण्यांतून महाराजांचे चित्र रेखाटले आहे.
यापूर्वीही त्यांनी शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या हाताच्या ठशांमधून शिवाजी महाराजांचे चित्र साकारले होते. तसेच, विद्यार्थी दशेत ४ बाय ५ एमएम इतक्या लहान साईजमध्ये अवघ्या १६ मिनिटे १५ सेकंदात महाराजांचे चित्र रेखाटून आशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रम प्रस्थापित केला आहे. पेन्सिलच्या टोकावर आणि तांदळावर नाव कोरण्याच्या त्यांच्या कलाकृती विशेष चर्चेत राहिल्या आहेत.
केवल यादव यांनी शिवाजी विद्यापीठाच्या युवक महोत्सवात सलग दोन वर्षे कोलाज व पेंटिंग मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आता त्यांच्या कलेची गिनीज बुकात नोंद होण्यासाठी ते प्रयत्नशील असून, त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळावे, अशी शिवभक्तांची इच्छा आहे.


