स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या मुश्रीफांचा शाहू महाराजांना अजब सल्ला | Kolhapur Lok Sabha 2024
कोल्हापूर | महाराज अजूनही वेळ गेलेली नाही. अर्ज भरण्यापूर्वी फेरविचार करा असे विधान राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी छत्रपती शाहू महाराज यांना उद्देशून केले आहे. कोल्हापूरमधील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मविआचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी गुरुवारी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
संजय मंडलिक यांनी केलेल्या वक्तव्याचा साधा निषेध देखील न करता स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या मुश्रीफ यांनी महाराजांनाच निवडणूकीत न उतरण्याचा इशारा दिल्याने कोल्हापूरच्या जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहेत.
‘श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना मी स्वतः निवडणुकीला उभे राहू नये, म्हणून विनंती केली होती. राजकारण आले, निवडणूक आली की टीका होणार हे बोललो होतो. आम्हाला शाहू महाराज यांच्याबद्दल आदर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. उमेदवारी अर्ज भरायला वेळ असल्याने शाहू महाराज यांनी फेरविचार करावा, अशी भूमिका पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मांडली आहे.
‘शाहू महाराजांवर टीका होत राहिली तर त्याचा आम्हाला देखील त्रास होईल. मात्र, संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्याविरोधात वैयक्तिक टीका करणारे व्हिडिओ यायला लागले, तेव्हा त्याला उत्तरे दिली जाणार आणि वाद वाढणार, हे माहिती होते.
शाहू महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) लोकसभेचे उमेदवार म्हणून आता एका पक्षाचे झाले आहेत. त्यामुळे ते वादात ओढले जाणार, हे उघड होते’, असेही मुश्रीफ म्हणाले.

